धक्कादायक..! प्रॉपर्टीसाठी बहिणीला ठेवले मेंटल हॉस्पिटलमध्ये,आईला वृद्धाश्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 19:57 IST2025-07-20T19:57:28+5:302025-07-20T19:57:54+5:30

पुणे : वडिलोपार्जित मालमत्तेसाठी भावाने आपल्या मोठ्या बहिणीला इंजेक्शन देऊन ब्लड टेस्टच्या नावाखाली घेऊन जात मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकले, तर ...

Shocking..! Sister put in mental hospital, mother in old age home for property | धक्कादायक..! प्रॉपर्टीसाठी बहिणीला ठेवले मेंटल हॉस्पिटलमध्ये,आईला वृद्धाश्रमात

धक्कादायक..! प्रॉपर्टीसाठी बहिणीला ठेवले मेंटल हॉस्पिटलमध्ये,आईला वृद्धाश्रमात

पुणे : वडिलोपार्जित मालमत्तेसाठी भावाने आपल्या मोठ्या बहिणीला इंजेक्शन देऊन ब्लड टेस्टच्या नावाखाली घेऊन जात मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकले, तर वयोवृद्ध आईला जबरदस्तीने वृद्धाश्रमात जमा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी भावाला अटक केली आहे. धर्मेंद्र इंदूर राय (५४, रा. चेंबूर, मुंबई) असे अटक केलेल्या भावाचे नाव आहे. त्याच्याबरोबर ४ अनोळखी महिला बाउन्सरवर देखील विविध कलमांसह मेंटल हेल्थ केअर अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ५६ वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सिंध हाउसिंग सोसायटीत ७ जुलै रोजी दुपारी ३ ते १८ जुलैदरम्यान दुपारी चारच्या सुमारास दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची वयोवृद्ध आई या सिंध हाउसिंग सोसायटीत त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहत होते. ही मालमत्ता ताब्यात घेण्याच्या उद्देशाने फिर्यादी त्यांचा लहान भाऊ आरोपी धर्मेंद्र राय हा चार महिला बाउन्सर घेऊन आला. त्यांची मानसिक स्थिती चांगली असतानाही त्यांच्या डाव्या हातामध्ये इंजेक्शन दिले. त्यांना ब्लड टेस्टसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे, असे खोटे सांगून महिला बाउन्सरच्या मदतीने जबरदस्तीने मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांचा मानसिक छळ केला. तसेच त्यांच्या वयोवृद्ध आईला तिची परवानगी न घेता, जबरदस्तीने वृद्धाश्रमात दाखल केले. त्यांच्या राहत्या घराचा ताबा फिर्यादीकडे असतानादेखील फिर्यादीची फसवणूक करून जबरदस्तीने फिर्यादींना घराबाहेर काढून घराचा ताबा घेतला.

फिर्यादी यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकल्याचे समजल्यावर त्यांच्या शेजारी व इतर मित्रमैत्रिणींनी त्यांची तेथून सुटका केली. त्यांना त्यांच्या घरी आणल्यावर धर्मेंद्र राय याने त्यांना घरात येण्यास अटकाव केला. तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवले. चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज हांडे व त्यांच्या सहकार्यांना तत्काळ घटनास्थळी जात आरोपी धर्मेंद्र राय याला अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक करांडे करत आहेत.

Web Title: Shocking..! Sister put in mental hospital, mother in old age home for property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.