धक्कादायक : मैत्रिणीकडे का बघतो, विचारल्याने एकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 18:25 IST2019-02-25T18:21:34+5:302019-02-25T18:25:40+5:30
मैत्रिणीकडे का बघतो, यावरून झालेल्या भांडणात एकाचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. ही घटना खराडी येथील एम्पायर हॉटेलसमोर लेबर कॅम्प येथे आज सकाळी सहाच्या सुमारास घडली.

धक्कादायक : मैत्रिणीकडे का बघतो, विचारल्याने एकाचा खून
पुणे : मैत्रिणीकडे का बघतो, यावरून झालेल्या भांडणात एकाचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. ही घटना खराडी येथील एम्पायर हॉटेलसमोर लेबर कॅम्प येथे आज सकाळी सहाच्या सुमारास घडली. चंदन सिंग (वय ३६, रा. उबाळेनगर, वाघोली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ राहुल सिंग (वय २९, रा. साई सत्यम पार्क, उबाळेनगर, वाघोली, मूळ रा. ढेरी ओनसोल, ता. रोहताज, बिहार) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून टिपूसुलतान फिरोज मनसुरी (रा. चंदननगर) आणि अनिरुद्ध अमरीश राठोड (रा. सैनिकनगर, वडगावशेरी) यांच्याविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास चंदन सिंग हा मैत्रिणीसोबत बोलत उभा होता. त्या वेळी आरोपी मैत्रिणीकडे वाईट नजरेने पाहत होते. त्याचा जाब विचारल्याने चिडून जाऊन आरोपींनी चंदन सिंग यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डोक्यात दगडाने मारले. यानंतर हे सर्व जण घटनास्थळावरून निघून गेले. आज दुपारी बारा वाजता वाघोलीतील लाईफ लाईन हॉस्पिटल येथे चंदन सिंग गेले असता तेथेच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर पुढील तपास करीत आहेत.