पुण्यातील धक्कादायक घटना; नांदेड सिटीत १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या, ११ व्या मजल्यावरून मारली उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 17:13 IST2021-08-01T17:12:45+5:302021-08-01T17:13:12+5:30
अकराव्या मजल्यावरील टेरेस वरून तिने उडी मारून आत्महत्या केली

पुण्यातील धक्कादायक घटना; नांदेड सिटीत १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या, ११ व्या मजल्यावरून मारली उडी
धायरी : नांदेड सिटी येथे राहत असणाऱ्या १७ वर्षीय तरुणीने अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. श्रीया गणेश पुरंदरे (मधुवंती, नांदेड सिटी, नांदेड, ता. हवेली) असे तिचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
नांदेड सिटी येथील मधुवंती या इमारतीत पुरंदरे कुटुंबीय पहिल्या मजल्यावर राहावयास आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या गॅलरीत व्यायाम करणारे अभिजीत देशमुख यांना खाली काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी खाली पाहिले असता त्यांच्या मुलीच्या वर्गात शिकणारी श्रीया पडली असल्याचे दिसून आले. घटनास्थळी हवेली पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली असता अकराव्या मजल्यावरील टेरेस वरून तिने उडी मारून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हवेली पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीया ही सध्या बारावीमध्ये शिक्षण घेत होती. त्याचबरोबर ती नॅशनल हॉर्स रायडींगचे प्रशिक्षण घेत होती. श्रीयाला दहावी मध्ये ९५ टक्के मार्क मिळवून ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली होती. राज्य व राष्ट्रीय पातळीवर श्रीयाने हॉर्स रायडींगमध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत.