येरवड्यातील धक्कादायक प्रकार! अंत्यविधीसाठी उकळले जातायेत तब्बल २२ हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 11:10 IST2024-12-27T11:07:51+5:302024-12-27T11:10:04+5:30

एकंदरीत अंत्यविधीसाठी ज्या कार्यासाठी सहा-आठ हजार खर्च येऊ शकताे, तिथे नागरिकांकडून वीस-बावीस हजार रुपये आम्हाला माेजावे लागतात

Shocking incident in Yerawada As many as 22 thousand people are being boiled for funeral | येरवड्यातील धक्कादायक प्रकार! अंत्यविधीसाठी उकळले जातायेत तब्बल २२ हजार

येरवड्यातील धक्कादायक प्रकार! अंत्यविधीसाठी उकळले जातायेत तब्बल २२ हजार

लोहगाव : येरवडा येथील अमरधाम हिंदू स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी मयताच्या नातेवाइकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. अस्थिरूममध्ये अस्थी ठेवण्यासाठीसुद्धा हजार ते दोन हजार रुपये वसूल केले जात असून, नुकत्याच झालेल्या एका अंत्यविधीसाठी तब्बल २२ हजार रुपये उकळल्याचे पुढे आले आहे.

येरवडा स्मशानभूमीत दोन कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. या दाेघांकडून अमरधाम स्मशानभूमीत येणाऱ्या मयतांच्या नातेवाइकांना ग्राहक म्हणून बघतात. त्यांच्याकडून अंत्यविधीच्या नावाखाली पैसे उकळतात. विद्युतवाहिनीसाठीही पैसे घेत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासोबत लाकूड, गोवऱ्या, डिझेलवाहिनीसाठी डिझेल हे सामान घेण्याच्या नावावर अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन तेथे अंत्यविधी करू देतात. मयताचे नातेवाईक दुखवट्यामुळे मागेल ते गुपचूप देतात. याचा गैरफायदा घेत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

नऊ मन लाकडाचे पैसे घेतले...

अंत्यविधीला सहा मन लाकूड लागते. मयताच्या नातेवाइकांकडून नऊ मन लाकडाचे पैसे घ्यायचे आणि सहा मन लाकूड आणून तीन मनाचे पैसे परस्पर खिशात घालायचे हा प्रकार सातत्याने होतो. येरवड्यातील ज्या वखारीतून ह्या कमिशनखोर व्यक्ती लाकूड आणायच्या त्याने कमिशन देणे बंद केल्याने त्या वखारीला अखेर कुलूप लावावे लागले, असेही एका स्थानिकाने सांगितले.

असा झाला प्रकार उघड!

याबाबत अधिक माहिती प्राप्त झाली ती अशी, गणेश देवरे (४३, रा. अमरधाम स्मशानभूमी, गुंजन चौक, येरवडा) आणि धीरज गोगावले (२५, रामनगर, येरवडा) या दोन व्यक्तींमध्ये दोन दिवसांपूर्वी वाद झाला. त्यात एकाने ‘मी कधी तुझ्या पोटावर पाय दिला काय?’ अशा स्वरूपात माेठमाेठ्याने सुरू झालेल्या संभाषणातून प्रकरण मारहाणीपर्यंत पाेहाेचले. त्यात गणेश देवरे ह्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार दाखल झाली. त्यांच्या या भानगडीत मयतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार उघडकीस आला.

अमरधाम स्मशानभूमीमध्ये कुठल्याही विधीसाठी पैसे घेतले जात नाहीत, असा फलक लावलेला आहे. पैसे मागितल्यास तक्रार करावी, असा स्पष्ट उल्लेख असताना निर्ढावलेले कर्मचारी मयतांच्या नातेवाइकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळतात.

अंत्यविधीच्या नावावर पैसे उकळणे ही बाब अत्यंत निंदनीय आहे. आम्ही अमरधाम येथे फलक लावूनही पैशाची मागणी होत होती. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर कर्मचारी गणेश देवरे यास हाकलून दिले. ठेकेदार पोटे यांना सांगितले तर त्यांनी त्याची बदली केली.- संजय भोसले (माजी नगरसेवक)

अमरधाम स्मशानभूमी येथील कळलेला प्रकार निंदनीय असून, गणेश देवरे ह्या कंत्राटी कर्मचाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. चौकशीअंती कुणी दोषी आढळल्यास बडतर्फ करण्यात येईल. - चंद्रकांत पोटे, स्मशानभूमी कंत्राटदार मनपा, पुणे

अस्थी काढण्यासाठी, अस्थिकोठीमध्ये दहा दिवस अस्थी ठेवण्यासाठी दोन हजार उकळले जातात. पुजाऱ्यासाठी कमिशन, न्हावी पाहिजेत मग त्यातही कमिशन, अंत्यविधीनंतरचे सोपस्कार पार पाडण्यासाठीही यांचेच लोक हजर असतात. एकंदरीत अंत्यविधीसाठी ज्या कार्यासाठी सहा-आठ हजार खर्च येऊ शकताे, तिथे नागरिकांकडून वीस-बावीस हजार रुपये आम्हाला माेजावे लागतात. हा प्रकार म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचाच प्रकार सध्या येरवडा अमरधाम स्मशानभूमीत घडत आहे. - अंत्यविधीसाठी आलेले एक नागरिक

Web Title: Shocking incident in Yerawada As many as 22 thousand people are being boiled for funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.