Shiv Sena stuck in BJP's circle | भाजपाच्या 'चक्रव्यूहा' त अडकली शिवसेना
भाजपाच्या 'चक्रव्यूहा' त अडकली शिवसेना

ठळक मुद्देसंभाव्य जागा वाटप: सांगताही येत नाही... अशी अवस्था२०१४ मध्ये ऐनवेळी युती तुटल्याची घोषणा करून शिवसेनेसमोर केले होते आव्हान निर्माण आधी टीका, आता साखरपेरणी

पुणे: विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीने निर्माण केलेल्या जागा वाटपाच्या चक्रव्यूहात शिवसेना पुरती अडकली आहे. समान जागा घेण्याला स्पष्ट नकार देत भाजपाने शिवसेनेसमोर पेच निर्माण केला आहे. स्पष्ट बहुमत एकट्याला मिळेल अशा पद्धतीने जागा वाटप करण्याचा आग्रह भाजपाने धरला असून शिवसेनेसमोर तो मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.
  ज्या जागांवर ज्यांचे आमदार असा फॉर्म्यूला ठेवण्याचा आग्रह भाजपाने धरला आहे. सन २०१४ मध्ये ऐनवेळी युती तुटल्याची घोषणा करून भाजपाने शिवसेनेसमोर आव्हान निर्माण केले होते. त्यात शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या तर भाजपाला १२२. विधानसभेच्या २८८ जागा आहेत. स्पष्ट बहुमतासाठीचा जादुई आकडा १४५ आहे. तो गाठण्यासाठी भाजपाला सन २०१४ मध्ये थोड्या म्हणजे २३ जागा कमी पडल्या. मागील जागा टिकवून कमी पडलेल्या जागा यावेळी मिळवण्याचा भाजपाच्या धुरिणांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच ज्या जागा जिंकल्या त्या त्यांच्याकडेच व उर्वरित जागांचे वाटप असा त्यांचा आग्रह धरण्यात आला होता. 
    भाजपाच्या १२२ व शिवसेनेच्या ६३ अशा जागा वगळता उर्वरित जागांची संख्या १०३ होते. त्याच्या वाटपाचा फॉर्म्युलाही भाजपाने समान न ठेवता जिंकलेल्या जागांच्या प्रमाणात किंवा मग ज्या जागांवर मागील वेळी दुसºया क्रमाकांला जो पक्ष होता त्यांच्याकडे असा ठेवण्याचा आग्रह धरला आहे. त्यानुसार १०३ जागांपैकी भाजपाला ६० व शिवसेनेला ४३ असे प्रमाण येते. म्हणजे मागील वेळी जिंकलेल्या १२२ जागा व त्यात या ६० जागा अशा एकूण १८२ जागा भाजपाच्या वाट्याला व मागील वेळी जिंकलेल्या ६३ व उर्वरितमधील ४३ अशा एकूण १०३ जागा शिवसेनेच्या वाट्याला येतात.
   सध्या सुरू असलेल्या चर्चेत भाजपा १६० व शिवसेना १२० जागा असे समझोता झाल्याचे सांगण्यात येते, मात्र त्याता अधिकृत दूजोरा मिळालेला नाही. तसे झाले तर (१६०-१२०) किंवा आधी ठरलेल्या फॉर्म्यूल्याप्रमाणे (१८२-१०३) झाले तरीही एकट्याच्या बळावर स्पष्ट बहुमत मिळवता येईल इतक्या जागा लढवण्याची(१६० किंवा१८२) संधी यात भाजपालाच मिळणार आहे. लोकसभेत दुसऱ्यांदा मिळालेल्या विजयामुळे विधानसभेतही त्यावरच शिक्कामोर्तब होणार अशा खात्रीत भाजपाचे केंद्रातील व राज्यातीलही नेते आहेत. त्यामुळेच केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांना युतीच्या संदर्भात स्पष्ट शब्दात युती करा मात्र तडजोड करून नाही असा संदेश दिल्याचे बोलले जात आहे.
...................
शिवसेनेची अवस्था सांगताही येत नाही... सारखी
युतीमध्ये सन २०१४ च्या आधी कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत असणाऱ्या शिवसेनेला सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढल्याचा मोठा फटका बसला. मोठ्या भावाची भूमिका तर आता त्यांच्याकडे राहिलेली नाहीच, पण सन २०१४ नंतर भाजपाची वागणूक त्यांच्याबरोबर कायमच सावत्र भावासारखी राहिली आहे. युती तोडली तर नरेंद्र मोदींच्या लाटेत टिकता येणाक नाही या भितीने शिवसेनेला ग्रासले आहे. त्यामुळेच भाजपा लादत असलेल्या अटी मान्य करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
------------------------------
आधी टीका, आता साखरपेरणी
सन २०१४ ची निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना भाजपाने युती तुटल्याचे जाहीर केले. तोपर्यंत त्यांनी निवडणुकीची सगळी तयारी पुर्ण केली होती. शिवसेने बेसावध होती, त्यामुळे त्यांना प्रचारापासूनची सर्व तयारी करावी लागली. स्वबळाचा नारा आधीपासून देत असले तरीही त्यांचे संघटन ऐनवेळी कमी पडले व भाजपाने बाजी मारली. त्यानंतर गेली ५ वर्षे शिवसेनेला त्यांच्याबरोबर जूळवून घेणे भाग पडले आहे. ‘त्यांच्यावर टिका, सरकारमध्ये सहभाग’ असे धोरण घेत शिवसेनेने ५ वर्षे सत्तेत काढली, मात्र आता मोदी यांची लोकप्रियता लक्षात घेत लोकसभेनंतर विधानसभेसाठीही टिका वगैरे विसरून त्यांच्या अटीनुसार निवडणूक लढवण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. 

Web Title: Shiv Sena stuck in BJP's circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.