मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस...'त्या' चार चिठ्ठ्या लिहीत शिरीष महाराजांनी संपवलं जीवन

By नारायण बडगुजर | Updated: February 5, 2025 20:20 IST2025-02-05T20:08:13+5:302025-02-05T20:20:56+5:30

देहूतील घरात आत्महत्या करण्यापूर्वी चार चिठ्ठ्या लिहून ठेवल्या आहेत. त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

Shirish Maharaj More ended his life by writing four notes What exactly is in the suicide note | मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस...'त्या' चार चिठ्ठ्या लिहीत शिरीष महाराजांनी संपवलं जीवन

मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस...'त्या' चार चिठ्ठ्या लिहीत शिरीष महाराजांनी संपवलं जीवन

-नारायण बडगुजर

पिंपरी :
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी देहूतील घरात आत्महत्या करण्यापूर्वी चार चिठ्ठ्या लिहून ठेवल्या आहेत. त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

पहिली सुसाइड नोट : प्रिय आकाश, मनीष, अक्षय, अजय आणि सर्वच मित्रांनो....

खरं तर युद्ध सोडून पळून जाणाऱ्या माणसाने मदत मागणे चूकच. पण कृपा करून आई-वडिलांना सांभाळा. चांगलं स्थळ पाहून दीदीचं लग्न लावून द्या. माझ्या डोक्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर आहे. तेवढा कर्जाचा डोंगर आई-वडिलांच्या डोक्यावरून उतरवा. कोणाचे किती रुपये आहेत, हे वडिलांना माहिती आहे, तरीसुद्धा मुंबई सिंघवी- १७ लाख रुपये, बचतगट - ४ लाख रुपये, सोने तारण - २ लाख २५ हजार रुपये, गाडी- ७ लाख रुपये, किरकोळ देणेदारी - ८० हजार रुपये आहे. यातील गाडी विकून ती बाकी संपेल. त्यानंतर २५ लाखांचे कर्ज उरते. तुम्ही सर्वांनी थोडी-थोडी मदत करून आई-वडिलांना जपा. तुम्हाला वाटत असेल, मी हे सहज फेडू शकलो असतो. पण आता लढण्याची ताकद नाही. मला माफ करा.
आणि हो आमची नवरीबाई.. तिची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त करून चाललोय. खूप गोड आहे प्रियांका. मला तिला कधी वेळच देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा पाहा अन्यथा ती लग्न करणार नाही. हात जोडून माफी मागतो...
- तुमचा शिऱ्या. 

दुसरी सुसाइड नोट : प्रिय बाळा आणि सर्व परिवार...

खूप कष्ट करा. आपली इको सिस्टीम उभी करा. मला माफ करा. थांबू नका. लढत राहा. विजय आपला नक्कीच आहे. स्वत:ला जपा. अधूनमधून वडिलांकडे लक्ष द्या. आयुष्याची इतिकर्तव्यता संपली समजून पूर्णविराम देत आहे.
 

तिसरी सुसाइड नोट : माझी लाडाची पिनू, प्रियांका...

खरं तर तुझा आता कुठं हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणि मी जातोय. तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागतो. माफ कर. आयुष्यात सर्वांत जास्त अपराधी मी कोणाचा असेल तर तुझा आहे. तुला न्याय देऊ शकलो नाही.

माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस. माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे, तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. मला माफ कर. तुझी सगळी स्वप्नं तोडून जातोय.

कुंभमेळा राहिला, वारी राहिली, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं. सगळंच राहिलं. मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू. तू खूप गोड आहेस. नि:स्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल; पण जप स्वत:ला. एवढा काळ थांबलीस. आता मीच नसेल त्यामुळे थांबू नको. पुढे जा. खूप मोठी हो. आणि हो खूप झाले कष्ट, आता वर्क फ्रॉम होम घे. माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या. मला माफ कर...

तुझाच अहो..
- शिरीष मोरे.

 

चौथी सुसाइड नोट : प्रिय मम्मी, पप्पा, दीदी...

काय लिहू... वयाच्या ३० वर्षांपर्यंत आयुष्यात जे जे करायचं म्हटलं, त्या सगळ्यात तुम्ही पाठीशी उभे राहिले. जे मिळवण्यासाठी कितीतरी वर्षे लागतात, ते तुमच्या पाठिंब्यामुळे काही वर्षांतच मिळवलं. तुमच्यामुळेच इथवर पोहोचलो. माझ्यामुळे तुम्हाला आयुष्यात कधीच मान खाली घालावी लागली नाही. एवढं सुंदर जगलो. मला जन्म दिलात, एवढं घडवलंत. पाठीशी उभे राहिलात. पण जेव्हा मी तुमच्यासाठी उभं राहिलं पाहिजे, नेमका तेव्हाच तुमचा हात सोडून जातोय. कधी-कधी सर्व मिळवूनसुद्धा माणूस युद्ध हरतोच. मीही थांबत आहे. याचा दोष सर्वस्वी माझाच आहे. तुम्हाला एकटं टाकून चाललोय. मला माफ करा...

- तुमचाच पप्प्या.

Web Title: Shirish Maharaj More ended his life by writing four notes What exactly is in the suicide note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.