शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
By किरण शिंदे | Updated: May 28, 2025 22:20 IST2025-05-28T22:20:07+5:302025-05-28T22:20:36+5:30
शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांच्यावर झालेला गोळीबाराचा प्रकार खरा नसून तो एक बनाव असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांच्यावर झालेला गोळीबाराचा प्रकार खरा नसून तो एक बनाव असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव निर्माण करून शस्त्र परवाना मिळवण्याचा प्रयत्न घारे यांनी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी निलेश घारे यांना अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील वारजे परिसरातील गणपती माथा भागात निलेश घारे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून पळ काढल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ परिसरात नाकाबंदी करून सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब, आणि तांत्रिक तपासाद्वारे काम सुरू केले. तपास अधिक खोलात गेल्यावर गोळीबार हा बनाव असल्याची माहिती समोर आली होती.
निलेश घारे यांनी काही महिन्यांपूर्वी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांनी स्वतःवर हल्ला झाल्याचा खोटा कट रचल्याचा संशय पोलिसांना आला. आपल्याला धोका असल्याचं भासवून शस्त्र परवाना मिळवणे हे यामागील उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे: सचिन गोळे, शुभम खेमणार आणि अजय उर्फ बगली सकपाळ यांनी अटक केली आहे. तर त्यांचा एक साथीदार संकेत मातले सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या आरोपींकडून चौकशी केल्यानंतरच निलेश घारे यांचा या कटात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी आता निलेश घारे यांनाही अटक केली आहे.