शेलपिंपळगाव येथे १६ वर्षीय मुलीवर अत्याचार; ग्रामस्थ आक्रमक, 'गाव बंद' ठेवून घटनेचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:41 IST2025-04-28T12:39:59+5:302025-04-28T12:41:09+5:30
चुकीच्या घडणाऱ्या घटनांची आपण पोलिसांना माहिती द्या, संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार

शेलपिंपळगाव येथे १६ वर्षीय मुलीवर अत्याचार; ग्रामस्थ आक्रमक, 'गाव बंद' ठेवून घटनेचा निषेध
शेलपिंपळगाव : शेलपिंपळगाव हद्दीतील मोहितेवाडी (ता. खेड) येथे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज (दि. २८) गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. तत्पूर्वी रविवारी रात्री गावातील नागरिकांनी एकत्र येऊन उघड झालेल्या 'लव्ह जिहाद' प्रकरणाची निषेध सभा घेत सदरील घटनेविषयी रोष व्यक्त केला.
मोहितेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय नराधमाने सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वयाचा फायदा घेवून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध जबदस्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. नराधम आरोपी आसिम मुलाणी याने पीडित अल्पवयीन मुलीवर १६ डिसेंबर २०२४ ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत वारंवार अत्याचार केला. झालेला प्रकार कुणाला सांगितला तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी देत होता. याप्रकरणी आसीम मुलानी (रा. शेलपिंपळगाव) याचेवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान मांजरेवाडी येथील खुनाची घटना ताजी असतानाच तालुक्यात पुन्हा एकदा अत्याचाराची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक तरुणांनी या घटनेच्या निषेधार्थ निषेध सभा घेतली. या निषेध सभेला गावातील नागरिक व महिलांची संख्या लक्षणीय होती. गावातील ग्रामदैवत हनुमान मंदिरालगत असलेले नॉनव्हेज विक्रीचे शॉप बंद करावे, जामा मस्जिदलगत अतिक्रमण करून केलेल्या पायऱ्या काढून टाकाव्यात तसेच नमाज पठण करण्यासाठी बाहेर गावांहून येणाऱ्यांवर बंदी घालावी अशा मागण्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त करत 'गाव बंदची' हाक दिली. त्यानुसार गावात एकदिवसीय कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शेलपिंपळगाव हद्दीत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आरोपींना शासन करण्यासाठी प्रशासन सक्षम असून नागरिकांनी कायदा हातात घेऊ नका. विंचूवाची नांगी आम्ही ठेचून काढू. चुकीच्या घडणाऱ्या घटनांची आपण पोलिसांना माहिती द्या. संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. - प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण