...म्हणून शरद पवारांनी मेट्रोतून प्रवास केला; टिकेनंतर महामेट्रोचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 17:45 IST2022-01-17T17:43:32+5:302022-01-17T17:45:32+5:30
पवारांनी स्टेशन परिसराची पाहणी करून त्यांनी फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका असा प्रवासही मेट्रोने केला

...म्हणून शरद पवारांनी मेट्रोतून प्रवास केला; टिकेनंतर महामेट्रोचं स्पष्टीकरण
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी आज पुणेमेट्रोच्या फुगेवाडी स्टेशनला भेट दिली. स्टेशन परिसराची पाहणी करून त्यांनी फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका असा प्रवासही मेट्रोने केला. त्यांच्या याच मेट्रो प्रवासावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी आक्षेप घेत शरद पवारांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोची चाचणी म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असल्याचे सांगत टीका केली होती. तसेच मेट्रो प्रशासनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
त्यानंतर आता पुणे महामेट्रोकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले. मेट्रो प्रकल्पाची माहिती हवी म्हणून शरद पवारांकडून आम्हाला विचारणा करण्यात आली होती. पुणे मेट्रोचे काम सुरू होऊन साडेचार वर्षे झाली, परंतु ते आतापर्यंत कधीही आले नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांना फुगेवाडी येथील मेट्रो स्टेशनच्या कार्यालयात बोलावले. त्यानुसार ते आज या ठिकाणी आले होते.
हा प्रकल्प कधी सुरू झाला, खर्च किती, सध्याची स्थिती काय आहे ही सर्व माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर फुगेवाडी स्टेशनची त्यांना माहिती दिली आणि नंतर त्यांनी मेट्रोने प्रवास केला. आजच्या भेटीत मेट्रोची ट्रायल रण झाली नाही, शरद पवारांना फक्त मेट्रो संदर्भातली माहिती देण्यात आली. या मार्गावरील मेट्रोची ट्रायल 2019 मध्येच झाल्याचे महामेट्रोचे सरव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी मेट्रोतून प्रवास केल्यानंतर शरद पवार यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मेट्रोची चाचणी घेऊन जणू काही त्यांच्यामुळे पुणे मेट्रोचा प्रकल्प झाल्याचे प्रशासनाने भासविणे म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असा प्रकार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना डावलून केवळ राज्यसभा सदस्य असलेल्या एका नेत्याच्या उपस्थितीत चाचणी घेतल्याबद्दल मेट्रोच्या प्रशासनाविरोधात आपण विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.