जुन्या चालीरीतींच्या बदलासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 05:18 PM2023-02-07T17:18:29+5:302023-02-07T17:19:39+5:30

सासवड (ता. पुरंदर) येथे आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त (१५० वर्षे) सत्यशोधक समाज परिषद आयोजित केले होती...

Sharad Pawar said Establishment of Satyashodhak Samaj for change of old customs | जुन्या चालीरीतींच्या बदलासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना- शरद पवार

जुन्या चालीरीतींच्या बदलासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना- शरद पवार

googlenewsNext

सासवड (पुणे) : महात्मा फुले यांचा दृष्टिकोन दीडशे वर्षांपूर्वीही ठोस समाज परिवर्तनाचा होता. त्यातून कर्मकांड, थोतांड, धार्मिक अंधश्रद्धा यावर प्रहार करीत जुन्या चालीरीती बदलण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाज स्थापला. एवढेच नाही, तर बांधकाम व्यवसायात त्यांनी अभियंत्याप्रमाणे कामे केली. तसेच समाज बांधणी करतानाही शेतकऱ्याने शेतीबोरबरच जोडधंदा करण्याचा ठोस उपाय समाजाला दिला. महामानवांच्या योगदानातून महाराष्ट्र घडला. त्यात महात्मा जोतीबा फुले यांचे नाव महाराष्ट्रात नव्हे. तर जगभरात त्यांच्या विचारातून पोहोचले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.

सासवड (ता. पुरंदर) येथे आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त (१५० वर्षे) सत्यशोधक समाज परिषद आयोजित केले होती. त्यावेळी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे होत्या. तर प्रमुख उपस्थितीत पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डाॅ. बाबा आढाव, अभ्यासक प्रा. हरी नरके, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे प्रा. प्रकाश पवार, स्वागताध्यक्ष संभाजी झेंडे, निमंत्रक रावसाहेब पवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, माणिकराव झेंडे, बाळासाहेब भिंताडे आदी उपस्थित होते. यावेळी डाॅ. बाबा आढाव यांना स्व. सदाशिव झेंडे ट्रस्टच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार आणि कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशात विवाह व्यवस्थापन व्यावसाय चौथ्या क्रमांकावर आहे. म्हणजे विवाहाच्या नावाखाली किती उधळपट्टी होते, हे लक्षात घेऊन विवाह साधेपणाने केले तर फुलेंचे विचार आचरणात आणल्यासारखे होईल. सत्यशोधक समाज विचार आम्हा पवार कुटुंबीयात पहिल्यापासूनच आहे. देशभरातील आताची परिस्थिती पाहता, दीडशे वर्षांनंतरही महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारांची गरज समाजाला आहे, असे वाटते. त्यातूनच लोकशाही व माणुसकी टिकेल. स्त्री-पुरुष समानता येईल व हा विचार भक्कम होईल.

आमदार संजय जगताप म्हणाले, सत्यशोधक समाज चळवळीने त्यावेळी लोकशाही, समता, बंधुता, सुधारणा, प्रगती आदी भूमिका मांडली. तरीही अजूनही घरात मुलगा व मुलगी यांच्यात समानता पाळली जात नाही. दोघांना समान न्याय देता येईल, त्यावेळी तुम्ही सत्यशोधक चळवळ मानली, असे म्हणता येईल. विवाहाचा खर्च दोन्ही बाजूंनी समान झाला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. नुसत्या मोदी किंवा पवार यांच्या भाषणाने समानता येणार नाही. प्रत्यक्ष कृती हवी.

Web Title: Sharad Pawar said Establishment of Satyashodhak Samaj for change of old customs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.