'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 18:29 IST2025-12-28T18:27:57+5:302025-12-28T18:29:33+5:30
अदानी यांनी शरद पवार यांना ‘माय मेंटॉर’ असे संबोधले. शरद पवारांना सर्व क्षेत्रातील माहिती अधिक आहे. शरद पवार माझ्यासाठी आदरणीय आणि आदर्श आहेत.

'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
बारामती : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या देशातील पहिल्या अत्याधुनिक महाविद्यालयाचे उद्घाटन बारामतीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी उद्योगपती गौतम अदानींवर ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांनी स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.
यावेळी उद्योजक गौतम अदानी यांनी त्यांच्या भाषणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. अदानी यांनी शरद पवार यांना ‘माय मेंटॉर’ असे संबोधले. शरद पवारांना सर्व क्षेत्रातील माहिती अधिक आहे. शरद पवार माझ्यासाठी आदरणीय आणि आदर्श आहेत. अदानी म्हणाले, 'परिवर्तनाचे प्रतीक म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. एक नेतृत्व कसे विकास साधू शकते, याचे उदाहरण म्हणून शरद पवार यांच्या कामांना बघितले जाते. कृषिमंत्री पदावर असताना त्यांनी केलेल्या कृषी धोरण, अन्नसुरक्षा कायदा, सहकारी संस्थांचा विकास आणि ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्याचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री पदावर असताना राष्ट्रीय हिताचे धोरण राबविणारा नेता क्वचितच दिसतो. त्यांना सर्व क्षेत्रातील माहिती आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर सामाजिक कामे उभारली आहेत.' असे अदानी यांनी सांगितले.
पवार कुटुंबातील मनमोकळ्या संवादाचे दर्शन -
बारामती येथील एआय सेंटरच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास शैलीत भाषणाची सुरुवात केली, ज्याने बारामतीकरांना हसवून टाकले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामतीच्या दोन्ही खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार यांचा उल्लेख खास शैलीत केला. पवार यांच्या या खास शैलीतील भाषणामुळे बारामतीकरांमध्ये हास्याचे वातावरण निर्माण झाले. यानिमित्ताने पवार कुटुंबातील मनमोकळ्या संवादाचे दर्शन घडले.