दसऱ्याच्या मुहूर्तावर शरद पवारांची पुण्यात सभा; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 11:53 IST2023-10-10T11:53:10+5:302023-10-10T11:53:54+5:30
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आणि अजित पवार पालकमंत्री झाल्यावर शरद पवार प्रथमच पुण्यात येणार

दसऱ्याच्या मुहूर्तावर शरद पवारांची पुण्यात सभा; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा २४ ऑक्टोबरला पुण्यात होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी १० वाजता सभेला सुरुवात होईल. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार यांची पुण्यातील ही पहिलीच जाहीर सभा आहे. यापूर्वी दोन वेळा सभा जाहीर झाली मात्र ती रद्द करण्यात आली.
ही सभा राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत (जि. अहमदनगर) विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलेल्या युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने होत आहे. या यात्रेची सुरुवात पुण्यातून हाेणार आहे. पुढे ती राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून फिरणार आहे. यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी म्हणून शरद पवार यांच्या या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरची ही पुण्यातील पहिलीच सभा असल्याने त्याबद्दल राजकीय वर्तुळात औत्सुक्य आहेत. त्यातही पुन्हा राष्ट्रवादीतून बाहेर जाऊन भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत राज्यातील सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळेही होण्याआधीच या सभेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत शरद पवार यांनी ठाम भूमिका घेतल्याने ते अजित पवार यांच्याविषयी सभेत काहीतरी बोलतीलच, असा शरद पवार यांच्यासमवेत असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वास आहे.