दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना अजित पवारांकडून ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 12:29 IST2025-04-22T12:28:23+5:302025-04-22T12:29:00+5:30
माहिती व विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत एकत्र आलो

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना अजित पवारांकडून ब्रेक
पुणे : काही विषय राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात. आता निवडणुका झाल्या आहेत. जनतेच्या काही अपेक्षा आहेत. त्यामुळे माहिती व विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून एकत्र आलो, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भेटीवर केला. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यावर आयोजित बैठकीत पवार काका-पुतणे एकत्र आल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, असे तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाल्याने अजित पवार यांनी त्याला अप्रत्यक्षरीत्या ब्रेक लावला.
पवार यांनी पुण्यात सोमवारी (दि. २१) सकाळपासून बैठका आणि कार्यक्रमांचा धडाका लावला. त्यात सकाळी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याबाबत आयोजित बैठकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा असतानाच, आता दोन्ही पवार एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. बैठक झाल्यानंतर अजित पवार यांना याबाबत विचारले असता, त्यांनी याकडे राजकीय अंगाने पाहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. आता राज्याच्या, तसेच देशाच्या निवडणुका झाल्या असून, दोन्ही ठिकाणी पाच वर्षांसाठी सरकार स्थापन झाले आहे.
जनतेला दिलेल्या शब्दांसाठी विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे. त्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. शरद पवार अध्यक्ष असलेल्या संस्थांवर मीही आहे. त्या ठिकाणी मी उपमुख्यमंत्री म्हणून हजर राहत नाही. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार काम करत आहेत. मीही त्या ठिकाणी हजर होतो, तसेच काँग्रेसचे आमदार विश्वजित कदमही उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काही निर्णय घेतले. एआयचा वापर करण्यासाठी पावले उचलली आहेत, तसेच येथील बैठकीत शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. ज्या बाबींमधून शेतकऱ्यांना फायदा होत असेल त्या बाबी कराव्या लागतील. अशा वेळी एकत्र बसावे लागल्यास तसे करावे लागेल. अन्य सर्व नेतेही बसतात, असेही ते म्हणाले.
मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते. त्यावर विचारले असता, हा आमचा कौटुंबिक कार्यक्रम होता. तो पवार कुटुंबीयांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याविषयी बाहेरच्यांनी चर्चा करण्याची गरज नाही, अशी सडेतोड भूमिका त्यांनी यावेळी घेतली.