शरद मोहोळ खून प्रकरण: मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ जणांवर ‘मोक्का’

By नितीश गोवंडे | Published: January 29, 2024 02:05 PM2024-01-29T14:05:41+5:302024-01-29T14:06:58+5:30

शरद मोहोळचा ५ जानेवारी रोजी कोथरूड येथील सुतारदरा परिसरात मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता....

Sharad Mohol murder case: mcoca against 16 people including main mastermind Ganesh Marne, Vitthal Shelar | शरद मोहोळ खून प्रकरण: मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ जणांवर ‘मोक्का’

शरद मोहोळ खून प्रकरण: मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ जणांवर ‘मोक्का’

पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ जणांविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. शरद मोहोळचा ५ जानेवारी रोजी कोथरूड येथील सुतारदरा परिसरात मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता.

याप्रकरणी गुन्हे शाखेने साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली आहे. तपासात गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार हे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्तांना सादर करण्यात आला होता. पोलिस आयुक्तांनी प्राप्त कागदपत्रांची पडताळणी करून आरोपींवर मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे करत आहेत.

गणेश मारणेचा शोध सुरु...

गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात गुंड गणेश मारणे याचे नाव समोर आले आहे. गणेश मारणे हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गणेश मारणे सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, त्याने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज देखील केला आहे.

गुन्ह्यातील आरोपी विठ्ठल शेलार याच्यासह इतर सर्व आरोपींची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी
करण्यात आली आहे. दरम्यान, फरार असलेल्या गणेश मारणे याने वकिलांमार्फत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे.

Web Title: Sharad Mohol murder case: mcoca against 16 people including main mastermind Ganesh Marne, Vitthal Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.