तरुणीच्या इच्छेविरुद्ध ठेवले शरीरसंबंध, त्यानंतर समाजात बदनामी करून मोडले तिचे लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 13:38 IST2021-04-15T13:36:49+5:302021-04-15T13:38:07+5:30
बलात्कार करून तरुणीचे लग्न मोडून बदनामी केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

तरुणीच्या इच्छेविरुद्ध ठेवले शरीरसंबंध, त्यानंतर समाजात बदनामी करून मोडले तिचे लग्न
पिंपरी: एका तरुणाने तरुणीचा विश्वास संपादन करून मैत्री केली. त्यांनतर इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवून तरुणीचे जमलेले लग्न मोडून समाजात बदनामी केली. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आंबी गावाच्या हद्दीत तसेच दादर, मुंबई येथे २०१७ ते २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रमेश दत्तू शिंदे (वय २६, रा. कुसवली, ता. मावळ), असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने निव्वळ मैत्री करतो असे सांगून तरुणीचा विश्वास संपादन केला. तिला फसवून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध केले. हा प्रकार कोणास सांगितला तर तुझी बदनामी करून तुझ्या लहान भावाला ठार मारेन, अशी धमकी आरोपीने दिली. फिर्यादीचे जमलेले लग्न मोडून तिची समाजात बदनामी केली. याप्रकरणी तरुणीने तक्रार केल्यानंतर बलात्कार प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्ग करून गुरुवारी दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे तपास करत आहेत.