Pune Crime: पुण्यात सत्तर वर्षीय महिलेवर हत्याराने वार करून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 14:25 IST2022-09-14T14:24:22+5:302022-09-14T14:25:02+5:30
वारजे ( पुणे ) : वारजेत आकाशनगर भागात एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना ...

Pune Crime: पुण्यात सत्तर वर्षीय महिलेवर हत्याराने वार करून खून
वारजे (पुणे) : वारजेत आकाशनगर भागात एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. सुलोचना सुभाष डांगी (वय ७०, रा. आकाशनगर, वारजे) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलीस व नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील डांगी हे आई सुलोचना व मुलगी गौरी यांच्यासोबत येथील एका छोट्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेत राहत असत. सुनील हे फर्निचरचे काम करीत तर त्यांची मुलगी गौरी ही एका खाजगी बँकेत कामाला होती. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास मुलगा व नात कोणीही घरात नसताना सुलोचना या एकट्याच घरात होत्या.
या इमारतीतील एक भाडेकरू काही कामानिमित्त वर जात असताना त्यांना डांगी यांचे दार उघडे दिसले. आत जाऊन पाहणी केली असता सुलोचना निपचित पडलेल्या दिसल्या. काहीतरी अघटित घडले असावे अशी शंका येऊन त्यांनी मागच्या इमारतीत राहणाऱ्या सुनील डांगी यांच्या बहिणीस बोलावले. यांच्या चेहऱ्यावर, मानेवर व हातावर तीक्ष्ण हत्याराचे व्रण पाहता तसेच आतल्या खोलीत कपाटाचे उघडलेले ड्रॉवर व इतर पडलेल्या वस्तूंचे निरीक्षण केले असता चोरीच्या उद्देशाने ही हत्या घडली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. या ठिकाणी उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, साहाय्यक आयुक्त रुक्मिणी गलांडे यांनी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या.