पासपोर्ट कार्यालयात सर्व्हर डाऊन ! हजारो नागरिकांची तब्बल ५ तास प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 21:03 IST2025-06-25T21:02:33+5:302025-06-25T21:03:56+5:30

ई-मेल, एसएमएस किंवा मोबाइल ॲपवरून तत्काळ संदेश दिला असता, तर नागरिकांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचले असते, असे एका महिला नागरिकाने सांगितले.

Server down at passport office! Thousands of citizens wait for 5 hours | पासपोर्ट कार्यालयात सर्व्हर डाऊन ! हजारो नागरिकांची तब्बल ५ तास प्रतीक्षा

पासपोर्ट कार्यालयात सर्व्हर डाऊन ! हजारो नागरिकांची तब्बल ५ तास प्रतीक्षा

पुणे : मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयात वेळेवर पोहोचलेल्या नागरिकांना ना नंबर, ना प्रक्रिया फक्त वाट पाहत बसावे लागल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. कारण, होते संपूर्ण यंत्रणा ठप्प... सर्व्हर डाऊनचे. या गोष्टी वारंवार घडत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.

गुरुवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट घेतलेले अनेक नागरिक वेळेआधीच उपस्थित होते. मात्र, त्यांचा नंबर येण्याआधी सर्व्हर डाऊन झाला. तासागणिक गर्दी वाढत गेली आणि गेटबाहेर २००-३०० नागरिक रांगेत उभे राहिले, तर गेटच्या आत २०० नागरिक अडकले. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत केवळ वाट पाहत रांगेत थांबावे लागले. त्यात अनेक लहान मुले, वृद्ध मंडळी, महिलांना नाहक त्रास सहन करावा लागला. दर १५-२० मिनिटांनी नवीन अर्जदार असलेली ८० लोकांची नोंद येत होती. पण, अधिकाऱ्यांकडून कुठलाही समन्वय, माहिती किंवा घोषणा नव्हती, असा अनुभव एका नागरिकाने सांगितला.

पुण्यासारख्या प्रगत शहरात केवळ एकच पासपोर्ट कार्यालय हेच मुळात धक्कादायक आहे. संपूर्ण पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच जवळच्या जिल्ह्यांतून नागरिक इथे येतात आणि एकाच कार्यालयावर ताण पडतो. परिणामी, तांत्रिक अडचण झाली की, संपूर्ण यंत्रणा ढेपाळते. नागरिकांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे आधीपासूनच उपलब्ध असते. अशा वेळी ई-मेल, एसएमएस किंवा मोबाइल ॲपवरून तत्काळ संदेश दिला असता, तर नागरिकांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचले असते, असे एका महिला नागरिकाने सांगितले.

कोणतीही पूर्वसूचना न देता हजारो लोकांना गेटबाहेर उभे ठेवणे, याला केवळ हलगर्जीपणा नव्हे, तर सार्वजनिक व्यवस्थापनातील अपयशच म्हणावे लागेल. या संपूर्ण गोंधळाची जबाबदारी कोण घेणार? एक दिवस वाया घालवलेले, पैसे खर्चलेले, अपॉइंटमेंट गमावलेले नागरिक आता संबंधित अधिकाऱ्यांकडून उत्तर आणि कारवाईची अपेक्षा करत आहेत. दरम्यान, संबंधित घटनेची माहिती घेण्यासाठी पासपोर्ट कार्यालय अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क झालेला नाही.

Web Title: Server down at passport office! Thousands of citizens wait for 5 hours