पुण्यामध्ये नऱ्हेगावात घडली गंभीर घटना! भरचौकात टोळक्याने तरुणावर कोयत्याने केले सपासप वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 20:18 IST2021-05-16T20:17:57+5:302021-05-16T20:18:02+5:30
सात, आठ जणांनी एकत्र मिळून केला हा प्रकार, तरुण गंभीर जखमी

पुण्यामध्ये नऱ्हेगावात घडली गंभीर घटना! भरचौकात टोळक्याने तरुणावर कोयत्याने केले सपासप वार
धायरी: नऱ्हेगावात एका अज्ञात टोळक्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार केले असून यामध्ये सुमित नाना वैराट हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झिल कॉलेज चौकात घडली.
नऱ्हेगावातील झील कॉलेज चौकातील रस्त्यावर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सात ते आठ तरुणांनी एकत्र जमून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. वार झाल्यानंतर इमारतीत असणाऱ्या एका व्यक्तीने जखमी तरुणाला घरात घेऊन दरवाजा लावल्याने त्या जखमी तरुणाचा जीव वाचला असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. दोन गटातील वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
घटनेचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव, उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले असून आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत. भर चौकात ही घटना घडल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.