एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक; मदतीचा बहाण्याने २० हजारांची रक्कम चोरली
By नम्रता फडणीस | Updated: December 13, 2024 18:59 IST2024-12-13T18:58:54+5:302024-12-13T18:59:50+5:30
याप्रकरणी चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक; मदतीचा बहाण्याने २० हजारांची रक्कम चोरली
पुणे : एटीएममधून पैसे काढणे ज्येष्ठाला चांगलेच महागात पडले. चोरट्यांनी मदतीचा बहाणा करून २० हजारांची रक्कम चोरून नेली. ही घटना बेलबाग चौकात घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक वारजे भागात राहायला आहेत. ते बेलबाग चौकात खरेदीसाठी आले होते. एटीएम केंद्रातून पैसे काढण्यासाठी ते गेले. त्यांच्या पाठोपाठ चोरटा एटीएममध्ये शिरला. चोरट्याने मदतीचा बहाणा केला. चोरट्याने त्यांच्याकडून डेबिट कार्ड घेतले आणि सांकेतिक शब्द घेतला. पैसे काढण्याचा बहाणा करून चोरट्याने त्यांना त्याच्याकडील बंद पडलेले डेबिट कार्ड दिले. एटीएममध्ये बिघाड झाला आहे. पैसे मिळत नसल्याची बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरटा तेथून निघून गेला.
चोरट्याने ज्येष्ठाच्या डेबिट कार्ड आणि सांकेतिक शब्दांचा गैरवापर करून खात्यातून २० हजारांची रक्कम चोरून नेली. एटीएममधून कोणीतरी परस्पर रक्कम चोरल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर ज्येष्ठाने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक पी. एम. वाघमारे तपास करत आहेत.