रात्रीच्या अंधारात गुपचूप राडारोडा टाकला अन् २१ लाख दंड भरला; वर्षभरात ६२९ जणांवर कारवाई
By राजू हिंगे | Updated: February 12, 2025 15:03 IST2025-02-12T15:02:40+5:302025-02-12T15:03:43+5:30
२०२५ च्या एका महिन्यातच ७ लाख ५ हजार ६५० रुपये वसूल केल्याची माहिती पुणे महापालिकेनी दिली आहे

रात्रीच्या अंधारात गुपचूप राडारोडा टाकला अन् २१ लाख दंड भरला; वर्षभरात ६२९ जणांवर कारवाई
पुणे: शहराच्या विविध भागात आणि नदीपात्रासह टेकड्यांच्या परिसरात रात्रीच्या अंधारात गुपचूप राडारोडा टाकणाऱ्यांवर पुणे महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. ६२९ जणांवर गेल्या वर्षभरात कारवाई करत २१ लाख २६ हजार ४५० रुपयांचा दंड पालिकेने वसूल करण्यात आला आहे. हा राडारोडा उचलून महापालिकेच्या वाघोली येथील राडारोडा प्रक्रीया प्रकल्पात पाठविण्यात आला आहे.
जुलै महिन्यांत मुठानदीला आलेल्या पूरानंतर महापालिकेकडून या पूरस्थितीचा अभ्यास करण्यासाठी चौकशी समिती नेमली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात शहरात नदीपात्रात तसेच लगत मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर महापालिकेने या राडारोड्याला आळा घालण्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर गस्ती पथके नेमण्यात आली होती. या पथकांकडूनही कारवाई सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात ५५ जणांवर तर जानेवारी १०८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर, या पथकांकडून २४ तास गस्त घालण्यात येत असून घनकचरा विभागाच्या गस्ती पथकांकडूनही राडरोडा टाकण्यांवर कारवाई केली जात आहे, असे घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.
गेल्या वर्षीचा महिनाभरातला दंड
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यांत ७० हजार ७५० रूपये दंड वसुल केला ,फेब्रुवारीमध्ये ३ लाख ५७ हजार, मार्च मध्ये २ लाख १६ हजार ७५०,एप्रिलमध्ये १ लाख ३८ हजार ७५०, मेमघ्ये १ लाख ५४ हजार ५००, जून मध्ये २ लाख ५२ हजार, जुलै मध्ये २ लाख ३८ हजार ५००, ऑगस्टमध्ये १ लाख ४६ हजार ५००, सप्टेंबर मध्ये २ लाख ५ हजार २५०,ऑक्टोबरमध्ये २ लाख २५ हजार २५० , नोव्हेंबरमध्ये १ लाख ४४ हजार २५०, डिसेंबर मध्ये २ लाख ५६ हजार ९५० रूपयांचा दंड वसुल केला आहे.
एका महिन्यात ७ लाख ५ हजाराचा दंड
पुणे महापालिकेने राडारोडा टाकण्यावर कारवाई केली आहे. पुणे महापालिकेने २०२५च्या महिन्यात ७ लाख ५ हजार ६५० रुपये वसूल केल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.