१० दिवसांत दुसरा जेरबंद; जुन्नरमध्ये अजूनही बिबटयाची दहशत कायम, पाळीव प्राण्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 16:49 IST2025-11-09T16:48:39+5:302025-11-09T16:49:20+5:30
बिबट्यांची संख्या कधी कमी होणार, बिबटे कधी पकडणार? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी यांना पडत आहेत

१० दिवसांत दुसरा जेरबंद; जुन्नरमध्ये अजूनही बिबटयाची दहशत कायम, पाळीव प्राण्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले
पिंपरी पेंढार (जुन्नर) : जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील घाडगेपट येथे भारत बोडके यांचे केळीच्या शेतामध्ये दहा दिवसांत दुसरा बिबट रविवार दि 9 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास जेरबंद झाला. याच परिसरामध्ये कोंबडवाडी, पिरपट, गाजरपट, जांभूळपट, खड़कमाळ, खारावने तसेच अगदी गावाला लागुनही अशा सर्वच परिसरात बिबटयाची मोठ्या प्रमाणात दहशत वाढली आहे. सध्या शेतीच्या कामाना वेग आला आहे. परंतु रात्रंदिवस या संपूर्ण परिसरात बिबट कधी कुठे निदर्शनास येईल याचा नेम नाही. त्यामुळे पिंपरी पेंढार च्या संपूर्ण गाव वाडीवस्त्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली जगत आहे.
आता तर बिबट्याने गावातही प्रवेश केला आहे. बिबट्यांची संख्या कधी कमी होणार, बिबटे कधी पकडणार असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिक शेतकरी यांना पडत आहे. मागील दोन वर्षापासून पिंपरी पेंढार आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचे हल्ले होऊन शेळी, मेंढी, गाय, म्हैस, कुत्रे अशा पाळीव प्राण्यांवर अनेक हल्ले झालेले आहेत. त्याचप्रमाणे दोन महिलांवर हल्ले करून त्यांनाही ठार केले आहे. ग्रामस्थ वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करतात. वन विभागाकडून पिंजरेही लावले जातात परंतु त्यामध्ये भक्षाचा अभाव तसेच बिबट्या पिंजऱ्यामध्ये न येणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. म्हणून बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. सध्या तरी पाळीव प्राणी यांच्यावर होत असलेले हल्ले वाढलेले आहेत. मनुष्यहानी होऊ नये म्हणून वन विभागाने त्वरित काळजी घेऊन बिबट्यासाठी पिंजरा लावावा ही अपेक्षा व्यक्त केली. सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेली अनेक वर्षांपासून बिबट या परिसरात नागरिकांच्या निदर्शनास येत आहेत. याच परिसरात नागरिकांना दिवसाही घराबाहेर पडणे कठीण झाले असुन दररोज कुणालातरी बिबट्याचे दर्शन होत आहे. सध्या शेतीची कामे जोमात सुरु आहेत. शेतीच्या कामांना वेग आला आहे परंतु बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करणे कठीण झाले आहे.
बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी वर्ग मोठया तणावात शेतीची कामे करत आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी संपूर्ण पिंपरी पेंढार गावची पाहणी करून पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडुन वनखात्याकडे होत आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी लहु ठोकळ यांच्याशी संपर्क साधला असता वन विभागाच्या वतीने परिसरातील पाहणी करून ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी पिंजरे लावण्यात येतील असे सांगितले.