पुणे शहरातील विद्यमान चार आमदारांच्या जागा धोक्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 01:08 PM2023-06-20T13:08:54+5:302023-06-20T13:10:54+5:30

शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोंमेट आणि वडगाव शेरीत यंदा बदल होण्याचा...

seats of the existing four MLAs in Pune city are in danger shivajinagar kasba vadgaon sheri cantonment | पुणे शहरातील विद्यमान चार आमदारांच्या जागा धोक्यात!

पुणे शहरातील विद्यमान चार आमदारांच्या जागा धोक्यात!

googlenewsNext

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्थांचे सर्व्हे समोर येत आहेत. प्रत्येकजण वेगवेगळा दावा करीत आहेत. न्यूज एरेना या संस्थेने केलेल्या ताज्या सर्व्हेमध्ये पुणे शहरातील विद्यमान चार आमदारांच्या जागा धोक्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसू शकतो, असे या सर्व्हेत म्हटले आहे. शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोंमेट आणि वडगाव शेरीत यंदा बदल होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

पुणे शहरात सध्या कसबा पेठेत काँग्रेस, वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, कॅन्टोंमेंटमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्यापैकी शिवाजीनगरमध्ये भाजपला धक्का बसून ती जागा काँग्रेसकडे जाईल, तर वडगाव शेरीत राष्ट्रवादीला पराभूत करून भाजप विजयी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सन २०१९ मध्ये शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेस शेवटच्या फेरीत मागे पडून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे ५,१२४ मतांनी विजयी झाले होते. तसेच वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांचा २,८२० इतक्या निसटत्या मतांनी, तर कॅन्टोंमेंटमध्ये सुनील कांबळे यांचा ५,०१२ मतांनी विजय झाला होता. या तीनही जागा दोन्ही पक्षांच्या दृष्टीने धोकादायक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कसबा पेठमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळविला. या विजयाचे पडसाद देशभर उमटून कसबा पॅटर्न प्रसिद्ध झाला. असे असले तरी पुढील निवडणुकीत ही जागा भाजपकडे जाईल, असे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे. त्याचप्रमाणे इंदापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप खेचून घेईल, असे यात म्हटले आहे. २०१९ मध्ये दत्ता भरणे यांनी ३ हजार ११० इतक्या कमी मतांनी विजय मिळविला होता.

राष्ट्रवादीच्या २ जागा कमी होणार?

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक ९ जागा भाजपला दाखविण्यात आल्या आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ८ आणि काँग्रेसला ४ जागा दाखविल्या आहेत. सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे १०, भाजपचे ८ आणि काँग्रेसचे ३ आमदार आहेत. हे पाहता भाजप व काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ जागा कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

Web Title: seats of the existing four MLAs in Pune city are in danger shivajinagar kasba vadgaon sheri cantonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.