Pune Schools Reopen: पुणे शहरातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा 16 डिसेंबरपासून सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 17:43 IST2021-12-14T17:42:53+5:302021-12-14T17:43:48+5:30
पुणे महापालिकेने १५ डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार असल्याचे सांगितले होते

Pune Schools Reopen: पुणे शहरातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा 16 डिसेंबरपासून सुरु होणार
पुणे : ओमायक्रॉन विषाणूची धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी सारख्या शहरात तर लॉकडाऊन करण्यात आला आहे. पुणे शहरात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असले तरी लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेकडून घेण्यात आला होता. पुणे शहरात सध्यस्थितीत ओमायक्रॉनचा एकच सक्रिय रुग्ण आहे. तसेच परदेशावरून येणाऱ्या प्रवाशांवर पुणे महापालिका लक्ष ठेऊन आहे. त्याच अनुषंगाने शहरातील शाळा १६ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.
राज्य सरकारने एक डिसेंबरला पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ओमायक्रॉन विषाणूमुळे सतर्क राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. पण शिक्षण विभाग आणि राजेश टोपे यांनी शाळा सुरु होण्याच्या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केल्यावर अनेक जिल्ह्यात शाळा सुरु करण्याच्या तयारीलाही सुरुवात झाली होती. मात्र मुंबई महापलिककेने या विषाणूचा धोका पाहता शाळा १ तारखेपासून सुरु होणार नसल्याचे जाहीर केले होते. तर पुणे महापालिकेने १५ डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार असल्याचे सांगितले होते.
जिल्ह्यातील पहिली ती चौथीपर्यंतच्या शाळा अजूनही बंदच
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पहिली ती चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळा सुरू न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले होते. जिल्ह्यातील प्राथमिक शाळा १ डिसेंबरपासून सुुरू होणार होत्या. मात्र, आफ्रिकेच्या नव्या विषाणूच्या संसर्गाचा वेग पाहता पुन्हा शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार सुरू होता. मात्र, विषाणूचा धोका ओळखून १ ली ते ४ च्या शाळा या सुरू न करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता.