सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास आजपासून प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:17 IST2025-12-10T10:17:09+5:302025-12-10T10:17:40+5:30
71st Sawai Gandharva Bhimsen Mahotsav: येत्या रविवारपर्यंत (दि. १५) हजारो संगीत रसिकांच्या सहभागातून महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाची सुरुवात वर्षभरात दिवंगत झालेल्या कलाकारांना श्रद्धांजली अर्पण करून होणार आहे.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास आजपासून प्रारंभ
पुणे : सूर, लय आणि ताल या त्रिवेणी संगमातून साकार झालेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या ‘स्वरयज्ञा’स बुधवारपासून (दि. १०) दिमाखात प्रारंभ होणार आहे. ७१ व्या महोत्सवात दिग्गज, ज्येष्ठ कलाकारांसह नवोदित, ताकदीच्या कलाकारांच्या कलाविष्काराचा सुरेल संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल येथे होणाऱ्या या स्वरयज्ञाची तयारी पूर्ण झाली असून, येत्या रविवारपर्यंत (दि. १५) हजारो संगीत रसिकांच्या सहभागातून महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाची सुरुवात वर्षभरात दिवंगत झालेल्या कलाकारांना श्रद्धांजली अर्पण करून होणार आहे.
महोत्सवाची सुरुवात दिल्लीस्थित लोकेश आनंद यांच्या सनईवादनाने होईल. त्यानंतर किराणा घराण्याच्या गायिका आणि पं. प्रभा अत्रे यांच्या शिष्या डॉ. चेतना पाठक आपली गायन सेवा सादर करतील. बनारस घराण्याचे प्रतिनिधी रितेश व रजनीश मिश्रा या मिश्रा बंधूंचे सहगायनाचा श्रवणीय आनंद घेता येणार आहे.
भारतरत्न पं. रविशंकर यांचे शिष्य पं. शुभेंदू राव आणि नेदरलॅण्ड्समधून भारतीय संगीतात साधना केलेल्या विदुषी सास्किया राव देऱ्हास यांचे सतार–चेलो सहवादन विशेष आकर्षण ठरणार आहे. पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या दरवर्षीप्रमाणे बहुप्रतीक्षित गायनाने होणार आहे. दरम्यान, कार्यक्रमस्थळी सुमारे ८ ते १० हजार संगीत रसिकांना सामावून घेणाऱ्या भव्य अशा मांडवाची उभारणी करण्यात आली आहे.
एलईडी स्क्रीन्स आणि कलाकारांचा आवाज शेवटच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचावा यासाठी अत्याधुनिक ध्वनियंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. यांसोबतच अल्पोपहाराची सोय असणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही महोत्सवाच्या ठिकाणी असणार आहेत. पुरुष व महिलांसाठी अद्ययावत अशी प्रसाधनगृहे मंडपाच्या मागील बाजूस उभारण्यात आली आहेत. पीएमपीएमएलतर्फे कार्यक्रम संपल्यानंतर विशेष बससेवा संगीत रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळविली आहे.