कात्रज : कात्रज परिसरामध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार एका शाळेच्या कार्यक्रमात प्रसंगी बुधवारी (दि २४) आले असता मांगडेवाडी व गुजर निंबाळकरवाडी परिसरातील नागरिकांनी शरद पवार यांची गाडी थांबवत पवारांना आमची घरे वाचवा असे साकडे घातले.
दक्षिण पुण्यातून रिंग रोड जात असून त्यात घरे जात असल्यामुळे नागरिकांनी पवारांना निवेदन दिले. त्यात मांगडेवाडी, गुजर-निंबाळकर वाडी, भिलारेवाडी रिंगरोड संदर्भात रस्ता मार्ग बदलण्यात यावा, रिंगरोड आमच्या घरावरून नेण्याऐवजी आजुबाजूच्या पर्यायी मार्गातून वळवावा,पर्यायी मार्ग आमच्या जागेच्या तुलनेत अधिक योग्य आहेत, त्यांचा विचार व्हावा, पीएमआरडीएचे अधिकारी सांगत आहेत. रिंग रोड हा खूप आधीपासून नियोजित केलेला आहे. जर असे असेल तर त्या भागातील सातबारे, खरेदीखते कसे होत आहेत. अजून त्यावर स्टॅम्प ड्युटी हे घेतली जात आहे. पीएमआरडीएकडून रिंग रोड बाधित सर्व सर्वे नंबर आधीच ब्लॉक का करण्यात आले नाहीत. तसे केले असते तर आम्ही जमिनी घेतल्या नसत्या व त्यावर घरे बांधली नसती. एवढ्या वर्षात अनेकांनी जमिनी घेतल्या व कर्ज काढून त्यावर घरे बांधली आहेत. त्या घरांवर पुणे महानगर पालिकेची कर आकारणी केलेली आहे. त्याच्या सर्व टॅक्स पावत्या देखील आहेत. पीएमआरडीएचा रिंग रोड हा पुणे महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरून प्रस्थावित केलेला होता. मांगडेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी इत्यादी अनेक गावे २०२१-२२ पासून महानगर पालिकेमध्ये गेलेली आहेत. तरी देखील हा रस्ता आत्ता महानगर पालिकेच्या अंतर्गत भागातून नेण्यात येत आहे असे निवेदनात म्ह्टले आहे.
नियोजित असलेला रिंगरोड हा आमच्या घरे-दारे आणि खाजगी मालमत्ता वरून नेण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे येथील रहिवाशांना आपली घरे आणि जमिनी गमवण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेकांनी खूप मेहनतीने घरे बांधली आहेत आणि काहींनी यासाठी कर्ज देखील घेतले आहे. ज्यामुळे अनेक नागरिकांना बेघर व्हावे लागणार आहे. त्यामुळे आमची घरे वाचवा असे सांगत मांगडेवाडी, गुजर-निंबाळकर वाडी, भिलारेवाडी येथील नागरिकांनी पवारांना निवेदन दिले.