२५ वर्षीय सौरभ स्वामी आठवले या इंजिनिअर असलेल्या तरुणाचा मृतदेह एका डोंगराळात भागात सापडल्यानंतर खळबळ माजली. धारदार शस्त्रांनी वार करत त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या हत्येचा तपास केला, तेव्हा हत्या करणारा ओळखीचाच आणि अल्पवयीन असल्याचे समोर आले. सौरभची हत्या मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्येसाठी मदत करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सौरभ आठवले हा पुण्यातील मांगडेवाडी येथे राहत होता. परिसरातीलच एका अल्पवयीन मुलीला तो बहीण मानत होता. दरम्यान, त्या मुलीचे एका अल्पवयीन मुलाशी प्रेमसंबंध असल्याचे सौरभला कळले. याबद्दलची माहिती तिच्या कुटुंबीयांना नव्हती. सौरभने याबद्दल तिच्या घरच्यांना सांगितले आणि हेच त्याच्या हत्येचे कारण ठरले.
'तुला याची किंमत चुकवावी लागेल'
सौरभने आपल्या प्रेमसंबंधांबद्दल घरी सांगितल्याचे मुलीने प्रियकराला सांगितले. त्यामुळे तो चिडला. मानलेल्या बहिणीच्या प्रियकराने सौरभला थेट जिवे मारण्याची धमकीच दिली. माझ्या नात्याबद्दल घरी सांगितले, तुला याची किंमत चुकवावीच लागेल', असे तो सौरभला म्हणाला.
...नंतर डोंगरात सापडला सौरभचा मृतदेह
१८ ऑगस्टच्या रात्री सौरभ घरातून बाहेर पडला, पण परत आलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्या कुटुंबीयांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, राजगड पोलिसांना शिंदेवाडी गावाजवळ डोंगराळ भागात तरुणाचा मृतदेह आढळला. ओळख पटवण्यात आल्यानंतर तो सौरभचा असल्याचे निष्पन्न झाले.
सौरभची हत्या करण्यासाठी मदत करणारे कोण?
हे सगळं समोर आल्यानंतर सौरभची हत्या कुणी केली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला. राजगड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी आणि सौरभ एकत्र जाताना दिसले. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेतले, तर इतर तिघांना पोलिसांनी अटक केली.
श्रीमंत अनिल गुज्जे (वय २१ वडगाव मावळ), संगम नामदेव क्षीरसागर (वय १९, वडगाव मावळ) आणि नितीन त्र्यंबक शिंदे (वय १८ वर्ष ५ महिने, कात्रज, मूळ गाव लातूर) यांनी सौरभची हत्या करण्यासाठी मदत केली. बहिणीचा अल्पवयीन प्रियकर आणि इतर तिघे सौरभच्या घरी गेले होते. त्यांनी सौरभला खाली बोलावलं.
त्यानंतर त्याला चौघांनी गाडीवर बसवले. सौरभला शिंदेवाडीजवळच्या डोंगरावर घेऊन गेले आणि तिथेच त्याची धारदार शस्त्रांनी हत्या केली. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या अॅक्टिव्हा, मोटारसायकल, मोबाईल, शस्त्र पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणात आरोपींना न्यायालयाने २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.