Satish Wagh Case : 'सुपारी फक्त हातपाय तोडण्याची होती, पण आमदाराचा अँगल आला आणि..', सतीश वाघ हत्या प्रकरणात नवीन खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 14:23 IST2024-12-28T14:22:08+5:302024-12-28T14:23:01+5:30
मारेकऱ्यांना जेव्हा सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत असे समजले अन्...

Satish Wagh Case : 'सुपारी फक्त हातपाय तोडण्याची होती, पण आमदाराचा अँगल आला आणि..', सतीश वाघ हत्या प्रकरणात नवीन खुलासा
- किरण शिंदे
पुणे - सतीश वाघ खून प्रकरणात पुणेपोलिसांनी त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक केली. मोहिनी वाघ सध्या पोलिस कोठडीत आहे. पोलिसांच्या चौकशीतून या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची आणि चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. सुरुवातीला सतीश वाघ यांचे फक्त हात पाय तोडण्याची सुपारी देण्यात आली होती. मात्र मारेकऱ्यांना जेव्हा सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत असे समजले. त्यानंतर त्यांनी त्यांचा खून केला. त्यांच्या शरीरावर तब्बल ७२ वार करण्यात आले होते.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील अनेक वर्षांपासून वाघ पती-पत्नीत वाद होते. सतीश वाघ यांची देखील बाहेर अनैतिक संबंध असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. तर मोहिनी वाघ यांचे देखील अक्षय जावळकर या शेजारीच राहणाऱ्या तरुणासोबत संबंध होते. यावरून वाघ दांपत्यात सतत वाद व्हायचे. सतीश वाघ हे पत्नीला मारहाण करायचे. तर घर खर्चासाठी पैसेही देत नव्हते. यावरून मोहिनी वाघ आतल्या आत धुमसत होत्या. त्यामुळेच त्यांनी सतीश वाघ यांचा काटा काढण्याचा ठरवलं. प्रियकर अक्षय जावळकर याच्या मदतीने तिने पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती.
मात्र ही सुपारी फक्त सतीश वाघ यांचे हातपाय तोडून त्यांना अपंग करण्याची होती. हात पाय तुटल्यानंतर तो घरात बसेल, त्यानंतर घरातील सर्व आर्थिक व्यवहार आपल्या ताब्यात येतील.. आणि आपल्याला त्याला सांभाळता येईल असा विचार म्हणून वाघ हिने केल्याचे चौकशीत समोर आले आहे. आणि त्या दृष्टीने मारेकऱ्यांना देखील सांगत आले होते. मात्र ९ डिसेंबर रोजी पहाटे सतीश वाघ यांची अपहरण झाले आणि त्यानंतर मारेकऱ्यांना सतीश वाघ हे आमदाराचे मामा असल्याचे समजले. आरोपींनी सतीश वाघ यांच्यावर ७२ वार करून संपवले.
दरम्यान मोहिनी वाघ हिने यापूर्वीही एका व्यक्तीला सतीश वाघ यांना ठार मारण्यासाठी सुपारी देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर तिने अक्षय जवळकर यांच्या मदतीनेच संपूर्ण कट रचला आणि अमलात आणला. मोहिनी वाघ हिला पुणे पोलिसांनी अटक केली असून ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या खून प्रकरणात तिच्याकडे चौकशी सुरू असून या चौकशीतून दररोज धक्कादायक आणि चक्रावणारी माहिती समोर येत आहे.