पुण्यातील रस्त्यावर पैशांची मस्ती; पोलिसांकडून दणका, गौरव आहुजाला साताऱ्यात घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 23:17 IST2025-03-08T23:16:25+5:302025-03-08T23:17:22+5:30

अखेर शनिवारी रात्री गौरवला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून लवकरच पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार आहे.

Satara police arrested Gaurav Ahuja for allegedly behaving in an indecent manner while stopping his car at Yerawada Chowk in Pune | पुण्यातील रस्त्यावर पैशांची मस्ती; पोलिसांकडून दणका, गौरव आहुजाला साताऱ्यात घेतलं ताब्यात

पुण्यातील रस्त्यावर पैशांची मस्ती; पोलिसांकडून दणका, गौरव आहुजाला साताऱ्यात घेतलं ताब्यात

किरण शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे|

Pune Crime: पुण्यातील येरवडा चौकात गाडी थांबवून मद्यधुंद अवस्थेत अश्लील वर्तन करणाऱ्या गौरव आहुजा या विकृताला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गौरव आहुजा याने सिग्नलवरच लघुशंका केली होती. तसंच त्याला या कृत्याबाबत हटकणाऱ्या व्यक्तीसमोर त्याने अश्लील चाळेही केले होते. अखेर शनिवारी रात्री गौरवला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून लवकरच पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार आहे.

पुण्यातील बड्या उद्योगपतीचा मुलगा असणाऱ्या गौरवने सार्वजनिक ठिकाणी दाखवलेली पैशांची मस्ती एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केल्यानंतर याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जाऊ लागला. याची दखल घेत पुणे पोलीस गौरव आहुजावर कारवाई करण्यासाठी त्याचा शोध घेत होते. अशातच त्याने शनिवारी सायंकाळी केलेल्या कृत्याची माफी मागत आपण काही तासांत येरवडा पोलीस ठाण्यात हजर होऊ, असं सांगणारा व्हिडिओ रिलीज केला होता. मात्र तो पोलीस ठाण्यात हजर होण्याआधीच सातारा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. 

दरम्यान, सातारा पोलिसांकडून आरोपी गौरव आहुजाला लवकरच पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार असून त्यानंतर त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे. 

'माफ करणे हा पर्याय नाही, कायदेशीर कारवाई होईल'

गौरव आहुजा फरार असताना त्याचा मित्र भाग्यश ओसवाल याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. तसेच येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माफ करणे हा पर्याय नसून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पुणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

गौरव आहुजाची गुन्हेगारी पार्श्वभूमी

गौरव आहुजा याला फेब्रुवारी २०२१ मध्ये क्रिकेट बेटिंगप्रकरणी अटक करण्यात आली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने गँगस्टर सचिन पोटेला याच्या टोळीवर कारवाई करत क्रिकेट बेटिंग रॅकेट उद्ध्वस्त केले होते. यात कॉलेजमधील विद्यार्थ्यांना बेटिंगच्या विळख्यात ओढण्यात आले होते. याच प्रकरणात गौरव आहुजावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 

Web Title: Satara police arrested Gaurav Ahuja for allegedly behaving in an indecent manner while stopping his car at Yerawada Chowk in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.