'ओ ठाकूर तुम ललितपर कितने मेहेरबान', ससूनच्या अधीक्षकांनी कारागृह अधीक्षकाला पाठवलेले पत्र समोर

By नितीश गोवंडे | Published: October 30, 2023 03:07 PM2023-10-30T15:07:28+5:302023-10-30T15:09:27+5:30

पत्रात ललित पाटील विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे ससून प्रशासनाकडून त्याचा मुक्काम वाढवण्यासाठी दाखवण्यात येत होते

Sassoon superintendent sanjiv thakur lalit patil letter to jail superintendent reveals | 'ओ ठाकूर तुम ललितपर कितने मेहेरबान', ससूनच्या अधीक्षकांनी कारागृह अधीक्षकाला पाठवलेले पत्र समोर

'ओ ठाकूर तुम ललितपर कितने मेहेरबान', ससूनच्या अधीक्षकांनी कारागृह अधीक्षकाला पाठवलेले पत्र समोर

पुणे: ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात अद्याप ससून रुग्णालयातील एकाही व्यक्तीवर कारवाई न झाल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात असताना, ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे स्वत:च ललितवर मेहेरबान असल्याचा अजून एक पुरावा सोमवारी समोर आला. ललितला टीबी असल्याकारणाने ससूनमध्येच ठेवण्यात यावे अशा आशयाचे पत्र ठाकूर यांनी येरवडा कारागृह अधीक्षक आणि वैद्यकीय अधीक्षकांना ७ सप्टेंबर रोजी पाठवले होते.

ललित पाटील याने २ ऑक्टोबर रोजी ड्रग्ज प्रकरणात पुणेपोलिस पकडतील या भीतीने पळ काढला. त्याला पळून जाण्यासाठी अनेकांनी मदत केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ४ जून रोजी ललित फुप्फूसाच्या आजाराचे कारण देत ससूनमध्ये दाखल झाला. यानंतर सतत उपचाराच्या नावाखाली तो तेथेच होता. ललित ससूनमधून त्याचे ड्रग्ज रॅकेट चालवत होता. ललित पसार झाल्यापासून आजपर्यंत ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर प्रत्येक बाब गोपनीयतेच्या नावाखाली बोलण्याचे टाळत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहेत.

मुक्काम वाढवण्यासाठीच्या पत्रात नेमके काय?

ललित ला टीबी आणि पाठदुखीचा आजार आहे. तसेच त्याला लठ्ठपणाचा देखील आजार असल्याने त्याच्यावर अजून उपचाराची आवश्यकता असल्याचे पत्रात म्हटले आहे. ललित २०२० ते २०२३ या काळात वारंवार विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे ससून प्रशासनाकडून त्याचा मुक्काम वाढवण्यासाठी दाखवण्यात येत होते. १२ डिसेंबर २०२० रोजी ललित पाटील हिंजवडी पोलिस ठाण्यातील जिन्यावरून पडल्याचे कारण देत पहिल्यांदा त्याला ससून रुग्णालयात भरती करण्यात आलं.  त्यानंतर त्याला हार्नियाचा त्रास असल्याच सांगून त्याचा मुक्काम वाढवण्यात आला. यानंतर ललितला पाठदुखीचा आजार जडल्याचा दावा डॉक्टरांनी केला. ललित पाटीलला लठ्ठपणाचा त्रास होत असून बॅरिएट्रिक सर्जरी करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते, त्यानंतर कहर म्हणजे सप्टेंबर महिन्यात ललित पाटील याला टीबी झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

ललित एवढा आजारी होता तर पळाला कसा..

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जर ललितला एवढ्या व्याधी जडलेल्या होत्या तर तो पळालाच कसा हा प्रमुख प्रश्न उपस्थित होत आहे. यासह ललित ससूनमधून वारंवार जवळच्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये जात असल्याचे देखील सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झालेले असताना, ललित आणि ससूनचे डॉक्टर यांच्यातील ‘अर्थ’पूर्ण संबंधांमुळेच त्याला ससूनमध्ये मोकळे रान मिळाल्याचे देखील आता दिसून येत आहे.

Web Title: Sassoon superintendent sanjiv thakur lalit patil letter to jail superintendent reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.