राजगड : राजगड तालुक्यातील पानशेत परिसरातील कादवे गावच्या ग्रामपंचायतीच्या विहीरीकडे जाणाऱ्या रस्त्याची सरकारी अधिकाऱ्यांसह पाहणी केल्याच्या कारणावरून भावासह (कादवे, ता. राजगड) चे सरपंच अनंता गणपत बिरामणे (वय-४५) यांच्यावर पाळीव कुत्र्यासह काठ्या व दगडांनी हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवार (ता. १५) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरपंच अनंता व त्यांचा भाऊ विनोद गणपत बिरामणे (वय-४०) हे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी हल्लेखोर अर्जुन बापु शिर्के (वय-२१) व करण बापु शिर्के (वय-२३) दोघे राहणार शिर्केवाडी, कादवे यांना काल रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. तर सरपंच अनंता बिरामणे यांच्या अंगावर पाळीव कुत्रे सोडून काठीने मारहाण करणाऱ्या शकुंतला मारुती शिर्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगंळ यांच्या देखरेखीखाली पोलिस अंमलदार अजय शिंदे तपास करत आहेत. याबाबत वेल्हे पोलिसांनी सांगितले की, कादवे शिर्केवाडी येथील ग्रामपंचायतीच्या विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्याची काही लोकांनी जाणून बुजून अडवणूक केली आहे. त्याबद्दल कादवे ग्रामपंचायतीच्या वतीने विहीरीकडे जाण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी राजगड तालुका तहसील व प्रांत अधिकारी व इतर सरकारी कार्यालयांमध्ये अर्ज केले आहेत. त्या अनुषंगाने सोमवार सकाळी सरकारी अधिकारी अडवणूक केलेल्या रस्त्याची स्थळ पाहणी करण्यासाठी आले होते.
अधिकारी पाहणी करून निघून गेल्यावर चिडुन जाऊन अर्जुन बापू शिर्के, करण बापू शिर्के व शकुंतला मारुती शिर्के यांनी संगनमताने सरपंच अनंता बिरामणे व कादवेचे पोलीस पाटील भाऊसाहेब भागुजी ढेबे यांना शिवीगाळ दमदाटी केली. त्यावेळी करण शिर्के व अर्जुन शिर्के याने सरपंच अनंता बिरामणे व त्याचा भाऊ विनोद बिरामणे याला दगड, लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी शकुंतला शिर्के यांनी त्यांच्या घरातील पाळीव कुत्रे सरपंच अनंता बिरामणे यांच्या अंगावर सोडले.