संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात; परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 12:34 IST2023-07-08T12:34:11+5:302023-07-08T12:34:29+5:30

परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले...

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony in Pune District; Neera bath for Mauli's feet on the return journey | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात; परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात; परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान

नीरा (पुणे) : आषाढी एकादशीच्या पांडूरंगाच्या दर्शनानंतर आज शनिवारी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. परतीच्या  प्रवासातील सातारा जिल्ह्यातील पाडेगाव ते पुणे जिल्ह्यातील वाल्हे हे सर्वात कमी अंतराचा टप्पा आज होता. परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर परतीच्या वारीत चालत चाललेल्या टाळकरी, विणेकरी, पताकाधारी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांना माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले गेले. 

संत ज्ञानेश्वर महाराजांचा २७६ वा पालखी सोहळा यावर्षी संपन्न होत आहे. शुक्रवार (दि.०७) रोजी सातारा जिल्हयातील पाडेगाव येथे मुक्काम होता. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता पालखी  सोहळा नीरा नदी किनारी आला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातील पालखीतून माऊलींच्या पादुका सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे नीरा नदितील स्नानासाठी देण्यात आल्या. आरफळकर, चोपदार व त्यांच्या सहकार्यांनी 'ज्ञानोबा माऊली.. ज्ञानोबा माऊली' च्या जयघोषात प्रसिद्ध दत्ता घाटावर माऊलींच्या पादुकांना स्नान घातले. 

माऊलींचे स्नान सुरु असताना सोहळ्यासोबत आलेले पुरुष विणेकरी, पताकाधारक व तुळशीवृंदावन घेतलेल्या महिलांनी रथाच्या पुढे व मागे दोन रांगा केल्या होत्या. पादुका पुन्हा रथाकडे आल्यावर प्रथम रथा पुढील व नंतर रथामागील विणेकऱ्यांना माऊलींच्या पादुकांचे स्पर्शदर्शन देण्यात आले. हा अभुतपुर्व सोहळा पाहण्यासाठी नीरा पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती.

परतीच्या प्रवासातील हा सोहळा 'माऊली माऊलीच्या' जयघोषात मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला. यानंतर माऊलींच्या सोहळ्याने सकाळी नऊ वाजता पुणे जिल्ह्यातील नीरा शहरात प्रवेश करत माऊलींची पालखी विठ्ठल मंदिरात विसाव्यासाठी ठेवण्यात आली. दुपारी दोन वाजता हा सोहळा पुणे जिल्ह्यातील पहिला मुक्काम असलेल्या वाल्हेकडे मार्गस्त होणार आहे.

Web Title: Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony in Pune District; Neera bath for Mauli's feet on the return journey