बनावट मोबाइल ॲक्सेसरीजची विक्री; बुधवार पेठेतील ६ दुकानदारांवर गुन्हा दाखल, १० लाखांचा माल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 20:04 IST2025-12-25T20:03:55+5:302025-12-25T20:04:12+5:30
ॲपल कंपनीचे उत्पादन असलेले साहित्य हुबेहूब नक्कल करून त्याची विक्री व साठा करणाऱ्यांविरोधात कंपनीच्या वतीने कॉपीराईट कायद्याअंतर्गत पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली

बनावट मोबाइल ॲक्सेसरीजची विक्री; बुधवार पेठेतील ६ दुकानदारांवर गुन्हा दाखल, १० लाखांचा माल जप्त
पुणे : नामांकित कंपनीच्या बनावट मोबाइल ॲक्सेसरीज विकणाऱ्या बुधवार पेठेतील तपकीर गल्लीतील ६ दुकानदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दुकानातून १० लाख ३९ हजार ७०० रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला. याबाबत विजय यशवंत सांगेलकर (५०, रा. बांद्रा, मुंबई) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कसणाराम घिगाजी चौधरी (२५), मुकेश पुरीकरण पुरीगोस्वामी (२९, रा. कात्रज), मनीष करमीराम चौधरी (३७, रा. पिंपळे सौदागर), जोगसिंग रूपसिंग राजपूत (३५, रा. रास्ता पेठ), हितेशकुमार माधाराम पुरोहित (२५, रा. शुक्रवार पेठ), राजेशचंद्र कृष्णचंद्र गोयल (६०, रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सांगेलकर हे ॲपल इंक कंपनीचे प्रतिनिधी आहेत. ॲपल कंपनीचे उत्पादन असलेल्या मोबाइल फोन व त्याचे मोबाइल चार्जर, मोबाइल कव्हर्स, इअरफोन, ॲडप्टर, इअरपॉड इ. साहित्याची हुबेहूब नक्कल करून त्याची विक्री व साठा करणाऱ्यांविरोधात कंपनीच्या वतीने कॉपीराईट कायद्याअंतर्गत पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. बुधवार पेठेतील समर्थ प्लाझा बिल्डिंग व ॲड्रॉर्न बिझनेस सेंटर परिसरात काही गाळ्यांमध्ये ॲपल कंपनीचे मोबाइलचे असेसरीजचे हुबेहूब नक्कल बनावटीकरण करून त्याचा होलसेल व किरकोळ स्वरूपात विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या कार्यालयातील पोलिस उपनिरीक्षक जाधव, हवालदार माने, रवींद्र पवार, चिवळे, पोलिस अंमलदार कुडाळकर, राजू शेख तसेच फरासखाना पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक गोरे, पोलिस अंमलदार शिंदे, माने, कांबळे यांनी समर्थ प्लाझा बिल्डिंगमधील प्रेम टेलिकॉम, राज टेलिकॉम शॉप, ओम राजेश्वर शॉप, राज सेल्स, ॲड्रान बिझनेस सेंटरमधील हिरा मोबाइल स्पेअर, गोयल मोबाइल दुकानातून एकूण १० लाख ३९ हजार ७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष गोरे करत आहेत.