‘सेट’चा पेपर फुटल्याची अफवा; विद्यापीठाने दाखल केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:26 IST2025-06-12T16:25:28+5:302025-06-12T16:26:10+5:30

सेट परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी एका यूट्यूब चॅनलवरून व्हायरल झाली. याची माहिती मिळताच सेट विभागाने सायबर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.

Rumors of SET paper leak; University files complaint | ‘सेट’चा पेपर फुटल्याची अफवा; विद्यापीठाने दाखल केली तक्रार

‘सेट’चा पेपर फुटल्याची अफवा; विद्यापीठाने दाखल केली तक्रार

पुणे :महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा (सेट) घेत असताे. नियाेजित वेळापत्रकानुसार, ही परीक्षा रविवारी (दि. १५) हाेणार आहे. या पार्श्वभूमीवर सेट परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी एका यूट्यूब चॅनलवरून व्हायरल झाली. याची माहिती मिळताच सेट विभागाने सायबर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक हाेण्यासाठी लागणारी सेट ही पात्रता परीक्षा घेण्याचे काम पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग करते. यानुसार रविवारी (दि. १५) ४०व्या सेट परीक्षेचे आयोजन तब्बल १८ शहरांमधील विविध महाविद्यालयांत केले आहे. या परीक्षेचा पेपर फुटल्याची व्हायरल हाेणारी बातमी फेक असून, त्यात काहीही तथ्य नाही. अशा बातम्या/ व्हिडीओवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन सेट विभागाने केले आहे. तसेच याप्रकरणी बुधवारी रात्री तक्रारही दाखल केली आहे.

पेपर फुटीबाबत चाैकशी करा!

सेट पेपर फुटीच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती आणि रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांच्या प्रतिनिधींनी कुलगुरूंकडे केली आहे. तसा लेखी पत्रव्यवहारदेखील केला आहे, अशी माहिती विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे राहुल ससाणे आणि रिपब्लिकन विद्यार्थी परिषदेचे सूरज गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: Rumors of SET paper leak; University files complaint