बिबवेवाडी परिसरात ‘बिबट्या असल्याची अफवा’; खात्री न करता स्टेटस ठेवल्यास कारवाई, प्रशासनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 13:12 IST2025-12-02T13:10:35+5:302025-12-02T13:12:08+5:30
तथ्य पडताळल्याशिवाय अशा प्रकारचे स्टेटस किंवा मेसेज शेअर करू नयेत. अफवा पसरवणे हा गुन्हा असून असे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे

बिबवेवाडी परिसरात ‘बिबट्या असल्याची अफवा’; खात्री न करता स्टेटस ठेवल्यास कारवाई, प्रशासनाचा इशारा
बिबवेवाडी : लेकटाउन परिसरातील आंबील ओढ्यात बिबट्या आढळल्याचा दावा करणारा मेसेज, फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. एका जबाबदार नागरिकाने ‘व्हाॅट्सॲप ग्रुप’वर हे फोटो शेअर केल्याचे समोर आले असून, त्यानंतर अनेक सोसायटी ग्रुपमध्ये ही माहिती वेगाने पसरली. या कारणाने नागरिकांमध्ये संभ्रम आणि घबराट निर्माण झाली आहे. मात्र, ही माहिती आणि फोटो सत्य नसून अप्रमाणित आहेत, असे पोलिस व वन विभागांनी स्पष्ट केले आहे.
काही नागरिकांनी व्हायरल झालेले फोटो हे एआय असल्याची शंका उपस्थित केली असून, “हे खरे आहेत का?” असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिस आणि वन विभागाने सांगितले आहे की, फोटोची टेक्निकल पडताळणी सुरू असून, लवकरच अधिकृत खुलासा करण्यात येईल. लेक टाउन–इंदिरानगर परिसरापासून काहीच अंतरावर कात्रज प्राणिसंग्रहालय असल्याने चर्चेला आणखी वेग मिळाला. दोन वर्षांपूर्वी संग्रहालयातील एक बिबट्या काही वेळेसाठी दिसेनासा झाला होता. मात्र, तो गार्डनच्या आतच सुरक्षित अवस्थेत दुसऱ्या दिवशी आढळला होता, त्यामुळे लोकांमध्ये अजूनच भीतीचे वातावरण आहे. उद्यान विभागाने कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले असले तरी, इंदिरानगर परिसरात वन्यजीव हालचालीचा एकही पुरावा सध्या उपलब्ध नाही. काही नागरिकांनी आणि सोसायटी ग्रुपमधील सदस्यांनी ही अपुष्ट माहिती व्हाॅट्सॲप स्टेटसवर टाकल्यानंतर प्रशासनाने गंभीर नोंद घेतली आहे.
बिबवेवाडीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी म्हटले आहे की, तथ्य पडताळल्याशिवाय अशा प्रकारचे स्टेटस किंवा मेसेज शेअर करू नयेत. अफवा पसरवणे हा गुन्हा असून असे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
आम्हाला दोन दिवसांपासून असे मेसेज येत असून आम्ही सर्व परिसराची पाहणी केली. सध्या तरी ही अफवा असून, तिचा कोणताही पुरावा नाही. एआय फोटोबाबतचा खुलासा लवकरच येणार असून, नागरिकांनी शांतता आणि जबाबदारी राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - राम रूपनवार (वनपाल)