- जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थी नोंदणीला होणार सुरुवातपुणे : बालकांच्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विशेष करून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा या राखीव ठेवल्या जातात. या सर्व जागांवर आरक्षित प्रवर्ग तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आज, बुधवारपासून आरटीई खासगी शाळा प्रवेश नोंदणीला सुरुवात होणार आहे.प्रत्यक्ष विद्यार्थ्याची नोंदणी प्रक्रिया ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून होणार आहे. मार्च महिन्यात विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच जून-जुलै महिन्यांतच प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.आरटीई प्रवेश प्रक्रियेचा मुहूर्त ठरल्याने आता पालकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण बालकांच्या मोफत व शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत दिल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेतील पहिला टप्पा आजपासून सुरू होत आहे. राज्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीईमार्फत मोफत प्रवेश देण्यात येतो. त्या अनुषंगाने ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.शाळा नोंदणीची प्रक्रिया ही साधारण ३ आठवडे असणार आहे. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होऊ शकते. त्यानंतर प्रवेशाची लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा पहिल्यांदाच जून-जुलै महिन्यात संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नियमित वेळेत आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचे वर्गही सुरू होऊ शकतील.एकीकडे डिसेंबर महिन्यात सीबीएसई शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असली, तरी आरटीई प्रवेश प्रक्रियेला मात्र मुहूर्त लागत नव्हता. अखेर यंदा संबंधित प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्व तयारी कार्यशाळा १५ जानेवारीऐवजी आता १५ डिसेंबरलाच घेतली जात आहे. विशेष म्हणजे अंतिम प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी १० एप्रिलवरून आता १० मार्च करण्यात आला आहे.
आजपासून खासगी शाळेची आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 10:07 IST