Video: ३ वर्षांच्या 'ग्यानवी' ला पाहून जीवात जीव आला, जवानाने घडवली आई अन् हरवलेल्या चिमुकलीची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:08 IST2025-04-03T12:07:05+5:302025-04-03T12:08:46+5:30
पुणे स्टेशनवर चिमुकली हरवल्यानंतर आई - वडिलांचा जीव कासावीस झाला, चिमुकली समोर येताच आईच्या जीवात जीव आला

Video: ३ वर्षांच्या 'ग्यानवी' ला पाहून जीवात जीव आला, जवानाने घडवली आई अन् हरवलेल्या चिमुकलीची भेट
अश्विनी जाधव केदारी
पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर हरवलेल्या चिमुकलीला कडेवर घेऊन आरपीएफ जवानाची धावपळ दिसून आली. एक तीन वर्षांची चिमुकली हरवली होती. जवानाने या चिमुकलीला घेऊन रेल्वे स्थानकावर तिच्या आई वडिलांना शोधायला सुरुवात केली. अखेर अर्ध्या तासात तीन वर्षांच्या 'ग्यानवी'ला तिच्या आई- वडिलांकडे सुपूर्त केले.
उन्हाळी सुट्यांमुळे पुणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, अशातच तीन वर्षांची चिमुकली हरवली. मात्र गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवान संतोष जायभाये यांच्या हे निदर्शनास आले. हरवलेल्या तीन वर्षांच्या 'ग्यानवी'चा रडका चेहरा पाहून तेही गहिवरले. लगेच त्यांनी तिला उचलून कडेवर घेतले आणि पुणे रेल्वे स्थानकावरील सहाही प्लॅटफॉर्मवर तिच्या आई-वडिलांना शोधण्यासाठी धावाधाव सुरू केली. तब्बल अर्धा एक तास धावपळ करून शोध घेतल्यावर अखेर तिचे आई-वडील सापडल्यावर तिला तिच्या आई- वडिलांकडे सुपूर्त केले.
३ वर्षांच्या 'ग्यानवी' ला पाहून जीवात जीव आला, आरपीएफ जवानाने घडवली आई अन् हरवलेल्या चिमुकलीची भेट#punerailwaystation#RPF#passenger#motherdaughter#father#familypic.twitter.com/S5P0ipx40F
— Lokmat (@lokmat) April 3, 2025
जवानाने मुलीला आईसमोर आणले. 'ये गुढीया कोण है, माँ है ना' असे म्हणत आईला भेटले. त्यावेळी रडून रडून घाबरून गेलेल्या आईला दिलासा मिळाला. जवानाने 'रडू नका रडू नका' असे म्हणत आईकडे चिमुकलीला परत केले. मुलगी कशी हरवली? असा प्रश्न विचारत त्याने 'आता रडू नका, मुलगी सापडली आहे. शांत व्हा काही काळजी करू नका' असे म्हणत आईला दिलासा दिला.