सिंहगड रोड येथे दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 11:41 IST2019-03-12T11:23:20+5:302019-03-12T11:41:52+5:30
सिंहगड रोडवरील धायरी येथील डी.एस. के स्कुलच्या मागील बाजूला असलेल्या घरावर ५ ते ६ जणांनी मध्यरात्री दरोडा टाकून तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने, दीड लाख रुपये असा ऐवज लुटून नेला.

सिंहगड रोड येथे दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लुटला
पुणे - सिंहगड रोडवरील धायरी येथील डी.एस. के स्कुलच्या मागील बाजूला असलेल्या घरावर ५ ते ६ जणांनी मध्यरात्री दरोडा टाकून तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने, दीड लाख रुपये असा ऐवज लुटून नेला. तसेच घराबाहेर असलेली दुचाकीही चोरुन नेली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी येथील डी. एस. के स्कुलच्या मागील बाजूला बाळू पोकळे यांचे शेतात घर आहे. त्यांच्या आजू बाजूला लांबवर वस्ती नाही. बाळू पोकळे, त्यांची पत्नी, आई वडिल हे घरात झोपले असताना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ४ ते ५ जण आले. त्यांच्या आवाजाने बाळू पोकळे उठले. त्यांनी दार उघडताच ते घरात शिरले. सर्वांना धमकावत त्यांचे हातपाय बांधले. त्यानंतर त्यांनी आई व पत्नीच्या अंगावरील तसेच घरातील १० तोळे सोन्याचे दागिने, घरातील कपाट ठेवलेली दीड लाख रुपयांची रोकड असा ऐवज जबरदस्तीने चोरला. त्यानंतर चोरांनी सर्वांना घरात कोंडले. घराबाहेर असलेली दुचाकी घेऊन ते पळून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
मंगळवारी सकाळी सिंहगड रोड पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले असून तपास सुरू करण्यात आला आहे.