Roated plot on onion farming land who destroyed by heavy rain | अतिवृष्टीला बळी पडलेल्या कांद्यावर फिरवला नांगर
अतिवृष्टीला बळी पडलेल्या कांद्यावर फिरवला नांगर

ठळक मुद्देऑक्टोबरमधील अर्थातच रब्बीचे सुमारे १२०० हेक्टर क्षेत्र बाधित बटाटा, बाजरी, मका, ज्वारी, फ्लॉवर, कोबी, पालेभाज्या आदी पिकांचा सहभाग

शेलपिंपळगाव : कांदा पिकाचे आगर असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यात अतिपावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. खेड तालुक्यात सुमारे १४ हजार १३४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून भात व कांद्याचे सर्वाधिक पीक पावसामुळे वाया गेले आहे. यापार्श्वभूमीवर शासनाने नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत. दरम्यान, खेडच्या पूर्व तसेच शिरूरच्या पश्चिम भागात काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक शेतातच नांगरून टाकले आहे. 
          उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत असतात. काही वेळा तोट्यात गेलेला कांदा अनेक वेळा भरघोस पैसा देऊन जात असल्याने शेतकऱ्यांचा या पिकाकडे मोठ्या प्रमाणात कल असलेला दिसून येत आहे. यंदा मात्र या पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अतिपावसामुळे पाणी आणले आहे. अनेक भागात पीक लागवडीनंतर चांगल्या स्थितीत होते. काही गावांमध्ये लागवड करून महिना - दोन महिने झाले होते. मात्र,  पावसाने पाठ सोडली नाही आणि सद्यस्थितीत कांदा शेतात सोडावा लागत आहे.
       शासनाने केलेल्या पंचनाम्यात कांदा व भात पिकाचे नुकसान ठळकपणे दिसून येत आहे. त्यासोबत बटाटा, बाजरी, मका, ज्वारी, फ्लॉवर, कोबी, पालेभाज्या आदी पिकांचा सहभाग आहे. खेड तालुक्यात खरिपातील २१३४ हेक्टर क्षेत्र तर ऑक्टोबरमधील अर्थातच रब्बीचे सुमारे १२०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. 
             अतिपावसाने कांदा हाती येण्यापूर्वीच काढून टाकावा लागत आहे. शिल्लक कांद्यावर रोगराई पसरली आहे. त्यामुळे पिकाच्या उत्पादनावर मोठा खर्च येत आहे. यापार्श्वभूमीवर सरकारने नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज कमी करण्याची मागणी सयाजीराजे मोहिते, सुभाष वाडेकर, संजय मोहिते, सजेर्राव मोहिते, बाळासाहेब दौंडकर, सागर रोडे, दिवाण पऱ्हाड, देवराम सुक्रे, सतीश पऱ्हाड , पांडुरंग बवले, विलास मोहिते आदींनी केली आहे.

करंदी हद्दीतील शेतकरी बाळू कदम यांनी त्यांच्या दीड एकरमधील कांद्यावर ट्रॅक्टरच्या मदतीने नांगर फिरवला आहे. अजित पऱ्हाड यांनी कांद्यात मेंढ्या सोडल्या. तर पऱ्हाडवाडीतील सागर रोडे यांनी त्यांचा कांदा उपटून टाकला आहे. एकीकडे पिकाच्या लागवडीसाठी हजारो रुपये खर्च करायचे आणि तोच कांदा हातात येण्यापूर्वीच विनामोबदला काढून टाकायचा अशी विदारक परिस्थिती पीक उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवल्याचे सर्रास दिसून येत आहे.

...............

शासनाने नुकसानग्रस्त पिकांना ८ हजार रुपये हेक्टर प्रमाणे नुकसानभरपाई जाहीर केली आहे. कांदा लागवडीपासून ते कांदा काढणीपर्यंत एका हेक्टरला कमीत कमी ४० हजार रुपये खर्च येत आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली भरपाई पिकांवर आत्तापर्यंत केलेल्या खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे पीक उत्पादक शेतक?्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे.

" खेड तालुक्यात अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शासनाने जाहीर केलेली मदत कमी आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर मदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल. तत्पूर्वी शासन निर्णय २०१५ नुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार आहे  - दिलीप मोहिते - पाटील , आमदार खेड.
         
" तालुक्यात तब्बल चौदा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेताच्या बांधावर जाऊन पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. शासन निर्णय २०१५ व शासन निर्णय २०१९ नुसार नुकसान भरपाईचा अहवाल जिल्हाधिकाकडे सादर केला आहे. - व्ही.डी. वेताळ, साहाय्यक कृषी अधिकारी खेड.

Web Title: Roated plot on onion farming land who destroyed by heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.