रस्त्याचे काम आणि अरुंद रस्त्याचा अडथळा

By Admin | Updated: May 28, 2014 02:06 IST2014-05-28T02:06:06+5:302014-05-28T02:06:06+5:30

उड्डाणपुलाचे काम, शेकडोंच्या संख्येत होणारी एसटी आणि पीएमपी बसची वर्दळ, रिक्षाचालक आणि टेम्पोंमुळे

Road work and narrow road obstacle | रस्त्याचे काम आणि अरुंद रस्त्याचा अडथळा

रस्त्याचे काम आणि अरुंद रस्त्याचा अडथळा

पुणे : उड्डाणपुलाचे काम, शेकडोंच्या संख्येत होणारी एसटी आणि पीएमपी बसची वर्दळ, रिक्षाचालक आणि टेम्पोंमुळे होत असलेली वाहतूककोंडी आणि त्यामध्ये भरडला जाणारा सामान्य नागरिक असे चित्र स्वारगेट येथील जेधे चौक ते लक्ष्मीनारायण चौकादरम्यान दररोज पाहायला मिळते. बाहेरगावांहून येणार्‍या शेकडो प्रवाशांना या समस्यांचा सामना करावा लागत असून प्रशासन मात्र ढिम्म आहे. कात्रजपासून स्वारगेटकडे उड्डाणपुलाचे काम टप्प्याटप्याने सुरु आहे. लक्ष्मीनारायण थिएटर चौकापासून स्वारगेटपर्यंतचे काम सध्या सुरु आहे. सातारा रस्त्याकडून येणार्‍या वाहनांना केवळ निम्मा रस्ता वापरण्याकरिता मिळत आहे, यामुळे वाहतूककोंडीत भर पडू लागली आहे. अजून किती दिवस कोंडीला सामोरे जावे लागेल, असा सवाल नागरिक करीत आहेत. उड्डाणपुलाच्या पुढे स्वारगेटच्या बाजूला बीआरटी लेन असल्याने सामान्य नागरिकांना अरुंद रस्त्याने वाहने पुढे नेणे भाग पडते, त्यामुळे लक्ष्मीनारायण थिएटरपासून जेधे चौकात येण्यास १० ते १५ मिनिटांचा वेळ लागत आहे. राजर्षी शाहू महाराज बस स्थानकामधून पहाटेपासूनच पीएमपीच्या बसची ये-जा सुरू असते, त्यामुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडते. स्वारगेट स्थानकाबाहेर रिक्षा आणि टेम्पोचालक उभे राहतात. रस्त्यात दोन ते तीन रांगांमध्ये समांतर गाड्या उभ्या राहतात, त्यामुळे एसटी चालकांना स्थानकात एसटी नेण्यास कसरत करावी लागते. त्यात स्थानकात प्रवेश करतानाचा रस्ता खचला असून खड्डे पडले आहेत. जेधे चौकात वाहतूक पोलीस असले, तरी अरुंद रस्ते आणि कामांमुळे कोंडी सोडविण्यास अडचण होत आहे.

Web Title: Road work and narrow road obstacle