The risk of breast cancer is also increasing among young women | तरूणींमध्येही वाढतोय गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका

तरूणींमध्येही वाढतोय गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका

ठळक मुद्देलैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या महिलांना नियमितपणे करून घ्यावी पॅप स्मिअर चाचणी कर्करोगपूर्व टप्प्यावर गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान होणे कठीण

पुणे : तरूण वयात लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या विशीतील मुलींमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढू लागली आहे. गर्भधारणेचे प्रमाण जास्त असणे, कमी वयात लैंगिक संबंध राखणे, हॉर्मोनल गर्भनिरोधकांचा दीर्घकाळ वापर, कनिष्ठ सामाजिक-आर्थिक स्तर, अस्वच्छता आणि अँटि ऑक्सिडंट्सचे प्रमाण कमी असलेला आहार या घटकांमुळे आजाराची शक्यता बळावत आहे. पुर्वी हा आजार ३० वर्षांवरील महिलांमध्ये आढळून येत होता.  
भारतातील महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे . गर्भाशयातील पेशी अनियंत्रितपणे वाढल्याने हा कर्करोग होतो. हा कर्करोग महिलांच्या गर्भाशयाच्या प्रवेशद्वाराला होतो. स्तनांच्या कर्करोगाच्या तुलनेने गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक असले तरी हा कर्करोग मोठ्या प्रमाणावर मृत्यूस कारणीभूत ठरणारा (सोशल कीलर) मानला जात नाही. हा आजार केवळ लैंगिक संबंधांमधूनच होतो, असा गैरसमज अनेकांमध्ये आहे. प्रतिबंधात्मक तंत्रांच्या माहितीचा आणि नियमित आरोग्य तपासणीने होणारे निदान याविषयीच्या माहितीचा अभाव यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
याविषयी बोलताना स्त्रीरोगतज्ज्ञ माधुरी बुरांडे लाहा म्हणाल्या, पूर्वी ३० वर्षांवरील महिलांमध्ये हा आजार आढळून येत असे. पण अलीकडील काळात विशीतील तरुणींमध्येही आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. तरुण वयात लैंगिकदृष्ट्या सक्रिय झालेल्या मुलींना हा आजार होण्याची शक्यता वाढते. संभोग करताना ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होऊ शकतो. परंतु, लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा आजार होतो, असे नाही.
-------------
लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या महिलांना नियमितपणे पॅप स्मिअर चाचणी करून घ्यावी. या कर्करोगाला प्रतिबंध करता येऊ शकतो. कर्करोगपूर्व टप्प्यावर गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान होणे कठीण असते. या आजाराविषयची जनजागृतीसाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये प्राथमिक माहिती देणे आवश्यक आहे.
- डॉ. अस्मिता पोतदार, स्त्रीरोगतज्ज्ञ
------------

Web Title: The risk of breast cancer is also increasing among young women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.