रिक्षा स्टॅंडला बाहेर काढले; रिक्षाचालक आणि ‘एसटी’ महामंडळात वाद; स्वारगेट बसस्थानकात परवानगीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 10:34 IST2025-03-18T10:34:30+5:302025-03-18T10:34:50+5:30
पूर्वीच्या जागी रिक्षा स्टॅंडला परवानगी द्या; अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा रिक्षाचालक संघटनेने दिला आहे

रिक्षा स्टॅंडला बाहेर काढले; रिक्षाचालक आणि ‘एसटी’ महामंडळात वाद; स्वारगेट बसस्थानकात परवानगीची मागणी
पुणे : स्वारगेट बसस्थानकात झालेल्या बलात्कार घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर बसस्थानकातील रिक्षाचालकांवर कारवाई करून रिक्षा स्टॅंड बाहेर काढण्यात आले. त्यामुळे रिक्षाचालक आणि ‘एसटी’ महामंडळामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पूर्वीच्या जागी रिक्षा स्टॅंडला परवानगी द्या; अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा रिक्षाचालक संघटनेकडून देण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरापर्यंत खासगी प्रवासी बस आणि इतर वाहने उभे करण्यास मज्जाव आहे. परंतु, स्वारगेट बसस्थानकात मेट्रोच्या कामामुळे खासगी रिक्षा स्टॅंडला परवानगी दिली होती. बलात्काराची घटना घडल्यावर रिक्षा स्टँड हलविण्यात आले. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, तसेच ‘एसटी’ महामंडळाच्या बसला स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी आणि बाहेर पडताना गैरसाेय हाेऊ नये यासाठी स्वारगेट बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ रिक्षा उभ्या करण्यास परवानगी द्यावी, असे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे.
स्वारगेट बसस्थानकाच्या परिसरात अस्ताव्यस्त रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते, या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. - प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक
स्वारगेट बसस्थानकाच्या जवळ महामेट्रोचे काम सुरू आहे. हे काम संपेपर्यंत एका बाजूला रिक्षा थांबा कायम ठेवण्याबाबत परवानगी द्यावी. काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या पूर्वीच्या थांब्यावर रिक्षा उभ्या केल्या जातील. जागा नाही मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल. – बापू भावे, रिक्षा फेडरेशन