बसची वाट पाहणाऱ्यांना रिक्षाचालकाने लुटले; दोघांकडून १४०० काढून घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:28 IST2025-01-20T12:28:09+5:302025-01-20T12:28:21+5:30
एकाला धमकावून त्याला ऑनलाइन पद्धतीने एक हजार रुपये जमा करण्यास सांगितले, रिक्षाचालक आणि साथीदार तेथून पसार झाले

बसची वाट पाहणाऱ्यांना रिक्षाचालकाने लुटले; दोघांकडून १४०० काढून घेतले
पुणे : महापालिका परिसरात पीएमपी बसची वाट पाहत थांबलेल्या दोघांना रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराने लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी रिक्षा चालकासह साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत जितेंद्रकुमार बाबूलाल (वय २९, सध्या रा. सूस गाव, पाषाण-सूस लिंक रस्ता) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूलाल आणि त्याचा मेहुणा मजुरी करतात. दोघे शनिवारी (दि. १८) सकाळी साडेपाचच्या सुमारास छत्रपती शिवाजी पुलावर पीएमपी बसची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी रिक्षाचालक आणि साथीदार तेथे आले. रिक्षाचालकाने कुठे जायचे आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर जितेंद्रकुमार आणि त्याचा मेहुण्याला मारहाण करून रिक्षाचालक आणि साथीदारांनी दोघांकडील १४०० रुपये काढून घेतले. जितेंद्रकुमारला धमकावून त्याला ऑनलाइन पद्धतीने एक हजार रुपये जमा करण्यास सांगितले. रिक्षाचालक आणि साथीदार तेथून पसार झाले. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.