पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव व जुन्नर भागात भात लावणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 15:56 IST2021-07-06T15:53:43+5:302021-07-06T15:56:35+5:30

पाऊस लांबल्यास भात उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता 

Rice planting started in the western part of Khed, Ambegaon and Junnar pune district | पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव व जुन्नर भागात भात लावणीला सुरुवात

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव व जुन्नर भागात भात लावणीला सुरुवात

पुणे: जिल्ह्यातील पावसाने दडी मारली असली तरी जुन्नर,  खेड आणि आंबेगाव तालुक्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम पट्ट्यातील भात खाचरांमध्ये पाणी आलेल्या व पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मोटारी लावून भात शेतीत पाणी घेऊन भात लावणीला सुरुवात केली आहे. पण पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास हे सर्व भात उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ शकतात. 

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या सहा तालुक्यात प्रामुख्याने भात लागवड केली जाते. जुन महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या चांगल्या पावसानंतर भाताची रोप टाकण्यात आली. त्या नंतर अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरीमुळे खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात भात रोपाची चांगली वाढ झाली. त्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या चांगल्या पावसाने भात खाचरामध्ये चांगले पाणी देखील आले. यामुळेच चांगले भात पिक येण्याच्या उद्दिष्टाने पाण्याची सोय झालेल्या शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात देखील केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी विहिरी, नदी अथवा ओढ्यामध्ये मोटार टाकून भात खाचरांमध्ये पाणी घेऊन भात लावणी उरकली आहे. पण आता गेल्या चार -पाच दिवसांत पावसाने पूर्णपणे दडी दिली असून कडक ऊन पडत आहे. हे वातावरण पुढील एक-दोन दिवस असेच राहिल्यास सर्वच भात उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Web Title: Rice planting started in the western part of Khed, Ambegaon and Junnar pune district