माळशेज घाटात पिकांच्या सोनसळी मोसमाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:04 IST2025-11-11T16:56:34+5:302025-11-11T18:04:12+5:30
या हंगामात अवकाळी पावसाने शेती पिकाचे नुकसान झाले असल्याचे देखील शेतकरी बोलत आहेत, भात पिकाची वाढ समाधानकारक झाली असल्याचे सांगत आहेत

माळशेज घाटात पिकांच्या सोनसळी मोसमाला सुरुवात
ओतूर : जुन्नर तालुक्यातील माळशेज पट्ट्यात सध्या सर्वत्र शेतकरी वर्ग भात कापणीच्या हंगामात मग्न झाला आहे. माळशेज घाट परिसरातील कोपरे मांडवे, सांगनारे, पिंपळगाव जोगा, कोल्हेवाडी, तळेरान, मढ पारगाव, खुबी करजाळे, शितेवाडी गावांमध्ये वाडा कोलम, वाय. एस. आर, दप्तरी, इंद्रायणी, सुरुची, खडक्या, कोळंबा आणि गरा या तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या सर्व भागात सध्या भात कापणी आणि काही ठिकाणी मळणीची कामे जोमात सुरू असून शेतांमधील दृश्ये पाहणाऱ्यांचे डोळे थबकून राहतात.
शेतांमध्ये दिवसभर कोयत्यांचा आवाज, थ्रेशर मशीनचा गडगडाट आणि ट्रॅक्टरच्या हालचालींनी ग्रामीण भाग गजबजून गेला आहे. शेतकरी कुटुंबातील महिला, पुरुष आणि तरुण वर्ग एकदिलाने कापणीच्या कामात गुंतला असून अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने भात बांधणी आणि वाळवणी केली जात आहे. काही ठिकाणी भाताचे पोते भरून घराकडे नेण्याचे, तर काही ठिकाणी मळणी व दळणवळणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या दिवसांत माळशेज घाट परिसर पुन्हा एकदा कृषी संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाला आहे.
या हंगामात अवकाळी पावसाने शेती पिकाचे नुकसान झाले असल्याचे देखील शेतकरी बोलत आहेत, भात पिकाची वाढ समाधानकारक झाली असल्याचे सांगत आहेत, शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर थोडे समाधान झळकत असून, मेहनतीचा मोबदला मिळत आहे. मात्र, या भागातील कापणीच्या कामामुळे ओतूरसह आसपासच्या गावांमध्ये कांदा लागवड, भाजीपाला शेती आणि इतर कृषी कामांसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक मजूर भातशेतीकडे वळल्याने इतर शेतीकामांसाठी मजुरीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी मजुरी दर दिवसाला शंभर ते दीडशे रुपयांनी वाढल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.
भात पिकांनी बहरलेल्या माळशेजघाट परिसराकडे पाहताना निसर्गाची ही समृद्ध देणगी आणि ग्रामीण कष्टकऱ्यांची मेहनत दोन्हींचे दर्शन घडते. कष्ट आणि आनंदाचा संगम असलेला हा भात कापणीचा काळ म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील उत्सव ठरला आहे.