पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना ग्राहक मंचाने दणका दिला आहे. ठेवीदारांनी गुंतवलेले 18 लाख 10 हजार रुपये त्यांनी व्याजासह 45 दिवसांत परत करावेत. याचबरोबर तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी 25 हजार आणि तक्रार अर्जाच्या खर्चाचे 5 हजार रुपये देण्याचाही आदेश मंचाने दिला आहे. डीएसके हे सध्या येरवडा कारागृहात आहेत.मंचाचे अध्यक्ष अनिल खडसे, सदस्या क्षितिजा कुलकर्णी आणि संगीता देशमुख यांनी हा निकाल दिला. याबाबत अतुल दत्तात्रेय रालेभट आणि कल्पना दत्तात्रेय रालेभट (रा. राष्ट्रभूषण चौक, पुणे) यांनी डीएसके कन्स्ट्रक्शनच्या तीन कंपन्यांविरोधात जून 2017 मध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांनी डीएसके यांच्या डी. एस. कुलकर्णी अँण्ड ब्रदर्स, डी. एस. कुलकर्णी अण्ड असोसिएट्स आणि डी. एस. कुलकर्णी बिल्डर्स या तीन कंपन्यांमध्ये 18 लाख 10 हजार रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. त्याबदल्यात त्यांना दर वर्षी 12 टक्के दराने व्याज मिळेल, असा करार त्यांच्यात झाला होता. ठेवींची मुदत संपत आल्याने डीएसके यांच्या कंपन्यांनी त्यांना धनादेश दिले. मात्र, त्यातील काही धनादेश वटले नाहीत. याबाबत कंपन्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी मंदीचे कारण दिले. त्यामुळे तक्रारदारांनी मंचात दावा दाखल केला होता. डीएसके यांच्या वतीने वकील मंचासमोर हजर झाले, मात्र त्यांनी लेखी म्हणणे सादर केले नाही. सेवेत दोष असल्याचा निष्कर्ष मंचाने काढला. त्यानुसार डीएसके यांनी तक्रारदारांना 18 लाख 10 हजार रुपये, 1 लाख 8 हजार रुपयांच्या व्याजासह 45 दिवसांत परत करावेत, असा आदेश मंचाने दिला.
ठेवीदारांचे 18 लाख व्याजासह परत करा : डीएसकेंना ग्राहक मंचाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 20:18 IST
ठेवींची मुदत संपत आल्याने डीएसके यांच्या कंपन्यांनी त्यांना धनादेश दिले. मात्र, त्यातील काही धनादेश वटले नाहीत...
ठेवीदारांचे 18 लाख व्याजासह परत करा : डीएसकेंना ग्राहक मंचाचा आदेश
ठळक मुद्दे45 दिवसांची मुदत