UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:41 IST2025-04-22T15:13:59+5:302025-04-22T15:41:20+5:30
युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून केंद्रीय लोकसेवा आयोगाने हा निकाल जाहीर केला आहे.

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
UPSC Exam 2024: यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला आहे. यूपीएससीच्या निकालासोबतच टॉपर्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. यावेळी प्रयागराज येथील शक्ती दुबेने परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे तर हर्षिता गोयलने दुसरा क्रमांक पटकावला आहे. पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
यूपीएससीने २०२४ च्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. प्रयागराजची शक्ती दुबे ही ऑल इंडिया टॉपर ठरली आहे. तर पुण्याचा अर्चित डोंगरे हा देशातून तिसरा आणि महाराष्ट्रातून पहिला आला आहे. एकूण १००९ उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या पाचमध्ये आलेल्या तीन महिला उमेदवार आहेत. आयोगाकडून भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि विविध गट 'अ' आणि गट 'ब' या केंद्रीय सेवांमध्ये नियुक्त्यांसाठी एकूण १,००९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
नागरी सेवा परीक्षा २०२४ अंतर्गत, यूपीएससीने आयएएस, आयपीएससह सेवांमध्ये ११३२ पदांसाठी अर्ज मागवले होते. पूर्वी मूळ अधिसूचनेतही फक्त १०५६ रिक्त जागा होत्या पण नंतर त्या ११३२ पर्यंत वाढवण्यात आल्या. त्यानंतर निकालात एकूण १००९ उमेदवारांना यश मिळालं आहे. त्यापैकी ३३५ उमेदवार सामान्य श्रेणीतील आहेत. १०९ जण ईडब्ल्यूएस, ३१८ ओबीसी, १६० एससी आणि ८७ एसटी प्रवर्गातील आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे १५ दिवसांनी उमेदवारांचे गुण जाहीर केले जातील. १७ एप्रिल २०२५ पर्यंत युपीएससी परीक्षेच्या मुलाखती सुरु होत्या. मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या सुमारे २८४५ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला.
पहिल्या दहा उमेदवारांची नावे
१. शक्ती दुबे
२. हर्षिता गोयल
३. अर्चित डोंगरे
४. मार्गी शहा
५. आकाश गर्ग
६. कोमल पुनिया
७. आयुषी बन्सल
८. राज कृष्ण झा
९. आदित्य विक्रम अग्रवाल
१०. मयंक त्रिपाठी