इंद्रायणीत वाहून जाणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्याला वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 16:15 IST2021-12-01T16:15:09+5:302021-12-01T16:15:24+5:30
आळंदी येथे कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक आले आहेत. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत

इंद्रायणीत वाहून जाणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्याला वाचवले
आळंदी : इंद्रायणी नदीत स्नान करत असताना पाय घसरून पडल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना ज्येष्ठ वारकऱ्याला एनडीआरएफ पथकाने रेस्क्यू ऑपरेशन करून वाचवले. रघुनाथ कराडे (वय ६५ रा. इंजेगाव, जि. बीड) यांना रेस्क्यू करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली. जेष्ठ वारकरी कराडे इंद्रायणी घाटावर स्नान करण्यासाठी आले होते. यावेळी ते पाय घसरून पाण्यात पडले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते वाहत जात होते. ही बाब एनडीआरएफ पथकाच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कराडे यांना पाण्यातून बाहेर काढले. प्राथमिक उपचारानंतर आळंदी पोलिसांनी त्यांना कुटूंबियांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, तीर्थक्षेत्र आळंदी येथे कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक आले आहेत. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ वारकऱ्याचा जीव वाचवल्याने एनडीआरएफ पथकाचे कौतुक होत आहे.