पावसाळी कामांचा ४ दिवसांत अहवाल द्या

By Admin | Updated: June 23, 2015 03:27 IST2015-06-23T03:27:36+5:302015-06-23T03:27:36+5:30

मॉन्सूनच्या आगमनानंतर झालेल्या पहिल्याच पावसाने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले, रस्त्यांवर मोठे खड्डे पडले यावरून महापालिकेच्या मुख्य सभेत सभासदांनी

Report rainy work within 4 days | पावसाळी कामांचा ४ दिवसांत अहवाल द्या

पावसाळी कामांचा ४ दिवसांत अहवाल द्या

पुणे : मॉन्सूनच्या आगमनानंतर झालेल्या पहिल्याच पावसाने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले, रस्त्यांवर मोठे खड्डे पडले यावरून महापालिकेच्या मुख्य सभेत सभासदांनी प्रशासनाला धारेवर धरले. सभासदांनी केलेल्या तक्रारींची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल ४ दिवसांमध्ये सादर करावा, असे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सोमवारी दिले.
मुख्य सभेच्या कामकाजाला सुरुवात होताच पहिल्या पावसाने शहरामध्ये झालेल्या दुरवस्थेच्या अडचणी मांडण्यास सभासदांनी सुरुवात केली. पहिल्याच पावसाने जर शहराची ही परिस्थिती होत असेल, तर आणखी ३ महिन्यांत काय दुरवस्था होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गणेश बिडकर म्हणाले, ‘‘शहरात पहिल्या पावसाने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. सिमेंटच्या रस्त्यांची कामे अर्धवट राहिली आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.’’ ताराचंद हॉस्पिटल येथे नुकताच तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असल्याचे रवींद्र माळवदकर यांनी स्पष्ट केले. स. प. महाविद्यालयाजवळ गुडघ्याएवढे पाणी साचत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मनीषा घाटे यांनी सांगितले. पावसाळी गटारांमधून व्यवस्थित गाळ काढण्यात आलेला नसल्याचे संजय भोसले यांनी स्पष्ट केले. पावसाळी पूर्वतयारीची कामे अशाच पद्धतीने सुरू राहिल्यास पुण्याची मुंबईसारखी स्थिती होण्यास वेळ लागणार नाही, असे दीपक मानकर यांनी स्पष्ट केले. दर वर्षी पाणी साचणारी ठिकाणे निश्चित करून त्याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक असल्याचे सभागृहनेते बंडू केमसे यांनी सांगितले. प्रशासनाने काहीच कामे केली नाहीत, असे म्हणता येणार नाही. राहिलेली कामे येत्या ८ दिवसांमध्ये पूर्ण केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य अभियंता विवेक खरवडकर यांनी सांगितले, ‘‘गावठाण परिसरातील ड्रेनेजलाईनच्या दुरुस्तीचे मोठे काम प्रशासनाने पार पाडले आहे. सिमेंटच्या रस्त्यांची कामे थांबविली जाणार नाहीत. सभासदांनी ज्या ठिकाणच्या तक्रारी केल्या आहेत, त्यांची पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील.’’

Web Title: Report rainy work within 4 days