कांद्याची जागा कोबी काढतोय भरून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 01:10 PM2019-12-05T13:10:07+5:302019-12-05T13:17:23+5:30

भाववाढीमुळे कांदा न ठेवणेच पसंत केले..

Replace the onion with cabbage filling | कांद्याची जागा कोबी काढतोय भरून

कांद्याची जागा कोबी काढतोय भरून

Next
ठळक मुद्दे कांद्याचे हे वाढलेले दर डिसेंबरअखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता गरजेपुरताच हॉटेल व्यायसायिकांकडून कांद्याचा वापर

पुणे : सर्वसामान्यांच्या घरातून उच्चांकी भाववाढीमुळे हद्दपार झालेला कांदा आता हॉटेल व्यावसायिकांनाही नकोसा झाला आहे़. भाजीवाटणापुरताच कांदा मर्यादित राहिला आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी जेवणाबरोबर कांद्याऐवजी आता कोबी देण्यावरच भर दिला आहे़. दुसरीकडे शहरातील भाजीपाला व्यावसायिकांनीही या भाववाढीमुळे कांदा न ठेवणेच पसंत केले असल्याचे दिसून येत आहे़. 
दिवसागणिक कांद्याचा भाव किलो मागे दहा पंधरा रुपयांनी वाढत चालला आहे़. जो कांदा बाजारात उपलब्ध होत आहे. तो बारीक, नवा तसेच बहुतांशी भिजलेला व खराबच आहे़. यामुळे असा कांदा तोही शंभरीच्या पुढे असल्याने विक्रीसाठी ठेवताना किरकोळ भाजीपाला व्यापारीही कच खात आहेत़. परिणामी, उपलब्ध कांद्याची किरकोळ बाजारात १३० ते १५० रुपयांपर्यंत विक्री होत आहे़. आजमितीला शहरात अनेक ठिकाणी जुना कांदा शोधूनही सापडत नाही, अशी परिस्थिती आहे़. त्यातच कुठे विक्रीस असला तरी त्याचा भाव हा किरकोळ विक्रीत दीडशे रुपयांच्या पुढेच आहे़. यामुळे किलोने खरेदी होणारा कांदा आज रोजी गरजेपुरताच, तोही तीस चाळीस रुपये पावशेर दराने खरेदी करण्यावर अनेकांनी समाधान मानले आहे़. 
दरम्यान, अशा परिस्थितीत शहरात चौका-चौकात दिसणाºया अंडाबुर्जीच्या गाड्यांची संख्याही रोडावली असून, ज्या आहेत. तेथे बुर्जीतील कांद्याचे प्रमाण कमी झाले आहे़. बहुतांशी हॉटेलमध्ये कांदा मागितल्यावर जादाचे दर ग्राहकांना द्यावे लागतील, असेही सांगितले जात आहे़ तर अनेक ठिकाणी कांदा नव्हे तर काकडी व कोबी पत्ता बारीक करून दिला जात आहे़. 
शहरात निवडणुकीपूर्वी कांदा पन्नाशीवर पोहोचला असताना, अनेक ठिकाणी वीस रुपये किलो दराने अनेक इच्छुकांच्या कार्यकर्त्यांनी कांदा विक्री केंद्रे सुरू केली होती़. परंतु, आता कांद्याचा हाच दर तिप्पट झाला असता ही कांदा विक्री केंद्रे गेली कुठे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे़. 
..
शहराची गरज दररोज शंभर ट्रक कांद्याची : आवक मात्र वीस-पंचवीस गाड्या 
1 मार्केट यार्डमध्ये दररोज येणारा शंभर ट्रक कांदा आजमितीला वीस ते पंचवीस गाड्यांवर आला आहे़ मागणीनुसार होणारी ही आवक पाहता ती अतिशय तुटपुंजी असून, हीच परिस्थिती जानेवारीपर्यंत कायम राहील, अशी शक्यता आहे़ 
2 सद्य:स्थितीला मार्केट यार्डात येणारा कांदा हा नवा व बारीक असून, त्याचा घाऊक बाजारातील दर ८० ते १०० रुपये इतका आहे़. जुना कांदा हा क्वचितच येत असून, ही आवक अत्यंत नगण्य आहे़. त्याचा दर घाऊक बाजारातच १४० ते १५० रुपये आहे़. 

कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी, कांद्याचे हे वाढलेले दर डिसेंबरअखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले. 
जानेवारीपासून नव्या कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे़. सद्य:स्थितीला दक्षिण भारतातूनही कांद्याला मोठी मागणी आहे़. यामुळे परदेशतील कांदा जरी आला तरी, कांदादरात घट होण्याची सध्यातरी शक्यता नसल्याचे ते म्हणाले़ .

Web Title: Replace the onion with cabbage filling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.