लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 16:23 IST2025-05-05T16:23:05+5:302025-05-05T16:23:44+5:30
जाे काही निकाल हाती आला असेल त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि पुढील वाटचाल निश्चित करा, असे आवाहन ‘लाेकमत’ आपल्याला करत आहे

लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
पुणे : मित्रांनाे, आज बारावीचा निकाल लागला आहे. त्यामुळे तुमच्यासह पालक आणि नातेवाइकांचेही डाेळे निकालाकडे लागले होते. पण, एक लक्षात ठेवा ! खूप मार्क पडले म्हणून हुरळून जाऊ नका आणि नापास झालात म्हणून खचू नका. बारावी किंवा दहावीत नापास झालं म्हणून काय आयुष्य थाेडेच संपत. पास-नापास याच्याही पलीकडे जगात खूप काही करण्यासारखे आहे.
एक सांगू, ज्याला आपण क्रिकेटचा देव म्हणताे ताे सचिन तेंडुलकरदेखील बारावीत अर्थशास्र विषयात नापास झाला हाेता. त्याचबराेबर मराठी सिनेसृष्टीत स्वत:चे गारुड निर्माण करणारा दिग्दर्शक नागराज मंजुळेदेखील दहावीत नापास झाला हाेता. तेव्हा दहावी-बारावीच्या निकालावरच सर्व काही अवलंबून राहू नका. जाे काही निकाल हाती आला असेल त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि पुढील वाटचाल निश्चित करा, असे आवाहन ‘लाेकमत’ आपल्याला करत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावी परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल आज अर्थात साेमवारी (दि. ५) दुपारी १ वाजता लागणार आहे. हा निकाल अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पाहता येणार आहे. त्यामुळे परीक्षार्थींसह पालक आणि नातेवाइकांचेही लक्ष या निकालाकडे लागले आहे. तेव्हा निकाल काय लागेल, आई-बाबांना काय वाटेल, मित्र-मैत्रिण काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील? अनपेक्षित निकाल लागला तर समाजाला ताेंड कसं दाखवू, असे भलते-सलते प्रश्न मनात आणू नका. निकाल जाे लागेल ताे लागेल. त्याला आनंदाने सामाेरे जा, असे आवाहन समुपदेशक करत आहेत.
ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ, करिअर समुपदेशक डाॅ. दीपक शिकारपूर म्हणाले की, बारावीत कमी मार्क पडले तरी ‘सीईटी’चा पर्याय उपलब्ध आहे. चांगले मार्क पडले त्यांचे काैतुकच आहे, पण कमी मार्क पडले म्हणून काेणी खचून जाण्याचे कारण नाही. तेव्हा कमी मार्क पडले म्हणून उमेद हरवून बसू नका.